अल्पवयीन मुलाने चालवली दुचाकी; वाहन मालकाला २५ हजारांचा दंड
विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
जिल्ह्यातील कोल्हार तालुक्यातील कुडगी गावात अल्पवयीन मुलाच्या हातात दुचाकी दिल्याप्रकरणी वाहन मालकाला बसवन बागेवाडी जेएमएफसी न्यायालयाने २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
तालुक्यातील कुडगी परिसरात एक अल्पवयीन मुलगा दुचाकी चालवत असल्याचे आढळून आले. कर्तव्यावर असलेले कुडगी पोलीस ठाण्याचे पीएसआय यतीश के. एन. यांनी त्या मुलाची दुचाकी अडवून चौकशी केली. मिळालेल्या माहितीनुसार, १२ जून रोजी सीसी क्रमांक 243/2026 अंतर्गत संबंधित वाहन मालक जगदीश तडकल्ल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत न्यायालयाने वाहन मालकाला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र (RC) ६ महिन्यांसाठी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय दुचाकी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाला वयाच्या १९ वर्षांपर्यंत वाहन चालविण्याचा परवाना देऊ नये, असेही न्यायालयाने निर्देश दिले आहेत.