रेल्वे रुळावर पडून युवकाचा मृत्यू
विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
जिल्ह्यातील कोल्हार तालुक्यातील कुडगी रेल्वे स्थानकाजवळ एक दुर्दैवी घटना घडली असून रेल्वे रुळावर पडल्याने एका युवकाचा मृत्यू झाला.
मृत युवकाची ओळख *संतोष ज्ञानप्पा हावीनवर (वय ३०), रा. मरिमट्टी, ता. बसवण बागेवाडी अशी झाली आहे.
तो कुडगी गावातील आठवडा बाजारात मोबाईल कव्हर, चार्जर आणि मोबाईल ग्लास विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी आला होता.
त्याने आपली दुचाकी कुडगी रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे ट्रॅकच्या परिसरात उभी केली होती. त्यानंतर बसवा एक्स्प्रेस (१७३०८)** ही रेल्वे जात असताना तो रुळांच्या मध्ये पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दलाचे (RPF) निरीक्षक कृष्णमूर्ती व इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
या प्रकरणी विजयपूर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.