गोविंदपूर येथे मालमत्ता वादातून सहाजणांची निर्घृण हत्या
विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर गावात मालमत्ता वादाच्या कारणावरून शुक्रवारी सायंकाळी सहा जणांची धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
चंदू निराळे (५६), दुंडप्पा निराळे (६५), शिवपुत्र निराळे (६०), राहुल निराळे (३५), समर्थ निराळे (२४) आणि शब्बीर नदाफ (५०) अशी मृतांची नावे आहेत.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, मृतांच्या कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
घटनेचा तपशील
प्राथमिक माहितीनुसार, १५ ते २० जणांच्या टोळीने शेतात काम करत असलेल्या निराळे कुटुंबीयांवर अचानक हल्ला केला. हल्लेखोरांनी प्रथम डोळ्यांत तिखटपूड फेकून त्यानंतर धारदार शस्त्रांनी सपासप वार करत सहाजणांची निर्घृण हत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, चडचण येथील निराळे कुटुंबाने गोविंदपूर गावातील एका व्यक्तीची २४ एकर वादग्रस्त जमीन सहा महिन्यांपूर्वी खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी ग्रामस्थांनी ही जमीन खरेदी करू नये, असा इशारा दिला होता. मात्र विरोध असूनही निराळे कुटुंबाने जमीन खरेदी केली होती.
सध्या ट्रॅक्टर व जेसीबीच्या सहाय्याने शेत साफ करून शेतीसाठी तयार करण्याचे काम सुरू असताना हा हल्ला झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मृतदेह चडचण तालुका सरकारी रुग्णालयात आणण्यात आले असून, रुग्णालयासमोर हजारो नागरिकांनी गर्दी केली आहे.
दरम्यान, हल्लेखोर नेमके कोण आहेत याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून तपास सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी दिली.
निराळे कुटुंबीयांनी गोविंदपूर येथील भाजप नेते अप्पुगौडा पाटील (गोलगी) व त्यांच्या सहकाऱ्यांवर हत्येचा आरोप केला आहे.
