भीमातीरी सहा जणांच्या हत्येप्रकरणी तपास वेगात, घटनास्थळी पुन्हा एसपी लक्ष्मण निंबरगी यांची भेट
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
भीमातीरी भागात सहा जणांच्या निर्घृण हत्येच्या प्रकरणात तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर विजयपूरचे पोलीस अधीक्षक (एसपी) लक्ष्मण निंबरगी यांनी पुन्हा एकदा घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, सहाही जण टवेरा ( के ऐ ४८ एम १३७५) कारमधून घटनास्थळी आले होते. हल्लेखोरांनी निराळे कुटुंबातील सहा जणांची हत्या केल्यानंतर त्यांनी वापरलेल्या टवेरा वाहनाचीही तोडफोड करीत कारच्या काचा फोडून वाहनाचे नुकसान करण्यात आले आहे.
ही नुकसानग्रस्त टवेरा कार आज सकाळी आढळून आली. हत्या झालेल्या ठिकाणापासून सुमारे २०० मीटर अंतरावर हे वाहन उभे असल्याचे निदर्शनास आले.
घटनेनंतर काल रात्रीच बेळगाव उत्तर विभागाचे आयजीपी संदीप पाटील आणि एसपी लक्ष्मण निंबरगी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची पाहणी केली होती.
आज पुन्हा एसपी निंबरगी यांनी हल्लेखोरांच्या निशाण्यावर आलेल्या टवेरा वाहनाची तपासणी केली. हत्याकांड घडवून आणल्यानंतर आरोपींनी निराळे कुटुंबाच्या मालकीच्या वाहनाचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीसांची कारवाई सुरू आहे.
