सिलिंडर गॅस गळतीमुळे आठ जण जखमी
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
जिल्ह्यातील ताळिकोट शहरातील बाजार परिसरातील हनुमान मंदिराजवळ असलेल्या भूमिका हॉटेल मध्ये गॅस सिलिंडरमधून गळती होऊन आग लागल्याने आठ जण भाजल्याची घटना घडली.
हॉटेलचे मालक बसवराज कुंभार यांनी नेहमीप्रमाणे हॉटेल सुरू करून नाश्ता तयार करण्याची तयारी सुरू केली होती. यावेळी स्टोव्हजवळ गॅसची गळती झाल्याने अचानक आग भडकली आणि तिच्या ज्वाळांनी संपूर्ण हॉटेलला वेढले. त्यामुळे हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या आठ जणांना भाजल्याच्या जखमा झाल्या.
जखमींना तातडीने स्थानिक ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना विजयपूर येथे पाठविण्यात आले.
यामध्ये शकील अहमद कुंभारवाड (वय ३५), बशीर अहमद कडदाळ (वय ४२) आणि राजकुमार गोटगुणकी (वय ७१) हे गंभीररीत्या भाजले आहेत.
तसेच किरण रामसिंग कोटिमणी (वय ४०), हॉटेल मालक बसवराज कुंभार (वय ४५), गुडूसाब पठाण (वय ६८), भीमप्पा नालतवाड (वय ४७) आणि दवलसाब मुदनाळ (वय ५५) यांनाही शरीरावर भाजल्याच्या जखमा झाल्या आहेत, अशी माहिती उपचार करणारे स्थानिक सामुदायिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. काशीनाथ बिरादार यांनी दिली.
घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक ज्योती खोत आणि एस. एम. पडशेट्टी यांनी भेट देऊन पाहणी केली असून, घटनेचा तपास सुरू आहे.
