सौ. सुप्रिया भारस्वाडकर यांना "ज्योतिर्विद्या वाचस्पती" ही उच्चतम पदवी बहाल
रत्नागिरी/ प्रतिनिधी
१७ मे २०२६ रोजी रत्नागिरी येथे "श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ, रत्नागिरी" या संस्थेतर्फे एकदिवसीय ज्योतिष संमेलन आणि संस्थेच्या विद्यार्थ्यांचा पदवीदान सोहळा आयोजित केला गेला होता. या सोहळ्यात सौ. सुप्रिया भारस्वाडकर यांना "ज्योतिर्विद्या वाचस्पती" या पदवीने सन्मानित करण्यात आले.
सौ. सुप्रिया यांनी "कुंडलीतील राहू केतू आणि वास्तुदोष" या विषयावर "ज्योतिर्विद्या वाचस्पती" या उच्चतम पदवीसाठी प्रबंध सादर केला. या शोधप्रबंधात सुमारे १०१ जातकांच्या कुंडल्या आणि त्यांच्या वास्तुचे नकाशे त्यांनी अभ्यासले आहेत. यामध्ये कुंडलीमध्ये राहूकेतूमुळे जे दोष आढळत आहेत, ते दोष वास्तूमध्ये देखील आहेत का? असतील तर त्याचा कुंडलीत राहूकेतू असलेल्या स्थानांशी, दिशांशी काही संबंध आहे का? त्या दिशांमध्ये वास्तूमधील कुठल्या गोष्टी आहेत? अशा सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास करून त्याचे विश्लेषण व निष्कर्ष मांडण्यात आला आहे.
याप्रसंगी श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि ब्रह्मचैतन्य ज्योतिष ज्ञानपीठाचे कुलपती डॉ. प्रसन्न मुळ्ये, कुलगुरू आचार्य श्री. राधेश बादले पाटील उपस्थित होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्री. अनंत आगाशे, गुरुश्री प्रिया मालवणकर, श्री. हरीश जोशी, डॉ. शैलेश देशपांडे, श्री. जितेंद्र दाते, श्री. श्रीनिवास रामदास, तसेच संस्थेचे सर्व सदस्य, विद्यार्थी देखील उपस्थित होते.
याप्रसंगी सौ. विवा साठे यांनादेखील "मुखचर्या व शरीरभाषा यांचा समुपदेशन प्रक्रियेतील वापर" या मुखचर्या शास्त्रातील विषयावरील शोधप्रबंधासाठी ज्योतिर्विद्या वाचस्पती ही पदवी प्रदान करून सन्मानित केले गेले.
