श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ या संस्थेचे 17वे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
रत्नागिरी/ प्रतिनिधी
प्रचार, प्रसार, प्रबोधन, प्रयत्न आणि प्रमाण या पंचसूत्रींच्या आधारावर कार्यरत असणाऱ्या, शासनमान्यता प्राप्त, तसेच आयएसओ 9001-2015 मानांकित "श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ, रत्नागिरी" या संस्थेतर्फे आयोजित १७ वे एकदिवसीय ज्योतिष संमेलन, पुरस्कार वितरण सोहळा व संस्थेच्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ दि. १७ मे २०२६ रोजी रत्नागिरी येथे संपन्न झाला. या संमेलनाला देशभरातून ९० पेक्षा जास्त ज्योतिष अभ्यासक व ज्योतिषप्रेमी उपस्थित होते.
"श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ, रत्नागिरी" संस्थेची स्थापना ७ एप्रिल २००८ रोजी अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर झाली होती. ४ ऑगस्ट २०१६ रोजी संस्था रजिस्टर झाली. यावर्षी संस्थेच्या स्थापनेला १८ वर्षे पूर्ण झाली आहेत.
या कार्यक्रमात "फलज्योतिष अभ्यास मंडळ, नाशिक" या संस्थेचे अध्यक्ष श्री. श्रीनिवास रामदास यांना ज्योतिषशास्त्रातील कार्यासाठी "पद्माश्री", अनेक वर्ल्ड रेकॉर्ड स्वतःच्या नावावर असणाऱ्या पुणे येथील श्री. जितेंद्र दाते यांना सामाजिक कार्यासाठी "कार्यगौरव", दोंडाईचा येथील सुप्रसिद्ध ज्योतिषी श्री. शैलेश देशपांडे यांना "चैतन्य भूषण", रत्नागिरी मीडियाच्या श्री. दत्तात्रय गोगटे यांना आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल "चैतन्य माध्यम" पुरस्कार, तसेच रत्नागिरीच्या कु. सुकन्या रायरीकर यांना ज्योतिषाचार्या डॉ. सविता कुलकर्णी यांचे स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या "सर्वोत्कृष्ट शिष्या" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संस्थेच्या कुंडली विशारद व कुंडली भूषण या अभ्यासक्रमांची पुस्तके आणि सौ. विवा साठे लिखित "चेहरे - प्रतिबिंब भावनांचे" या तीन पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
तसेच संस्थेच्या २०२५-२६ या वर्षी संपन्न झालेल्या कुंडली विशारद, कुंडली भूषण, कुंडली भास्कर, कुंडली अलंकार, ज्योतिर्विद्या वाचस्पती, वास्तुशास्त्र विशारद, मुखचर्याशास्त्र (प्रवीण, प्राज्ञ, विशारद) या अभ्यासक्रमात यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे पदवीदान व कौतुक सोहळा देखील संपन्न झाला. तसेच उत्तम कार्य करणाऱ्या १० अभ्यासकांना "विशेष लक्षवेधी", तर १६ अभ्यासकांना "लक्षवेधी उत्तेजनार्थ" या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी सौ. सुप्रिया भारस्वाडकर यांनी "राहू केतू आणि वास्तुदोष", तर सौ. विवा साठे यांनी "मुखचर्या व शरीरभाषा यांचा समुपदेशन प्रक्रियेतील वापर" या विषयांवर आपले शोधप्रबंध सादर करून "ज्योतिर्विद्या वाचस्पती" ही उच्चतम पदवी प्राप्त केली. तसेच कु. सुकन्या रायरीकर यांनी कुंडली भास्कर व कुंडली अलंकार, तर सौ. अंजली जोशी यांनी कुंडली भास्कर या उच्च पदवी अभ्यासक्रमांसाठी शोधप्रबंध सादर करून उच्च पदवी प्राप्त केली.
या प्रसंगी संमेलनाध्यक्ष म्हणून रत्नागिरी येथील उद्योजक व योग अभ्यासक श्री.अनंत आगाशे, तर प्रमुख अतिथी म्हणून नाशिक येथील ज्योतिषी व वास्तुतज्ञ श्री. हरीश जोशी आणि आध्यात्मिक लेखिका प्रवचनकार गुरुश्री प्रिया मालवणकर, तसेच ब्रह्मचैतन्य ज्योतिष ज्ञानपीठाचे कुलगुरू श्री. राधेश बादले पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी श्री. हरीश जोशी यांनी "ज्योतिषशास्त्र आणि वर्तमान", गुरुश्री प्रिया मालवणकर यांनी "श्री शिव पार्वती उपासना", श्री. विलास काणे यांनी "लग्नेशाची उच्च नीच फले", तर सौ. सुप्रिया भारस्वाडकर यांनी "राहूकेतू आणि वास्तुदोष" या विषयांवर व्याख्याने दिली.
या कार्यक्रमात "ज्योतिषीय प्रश्नमंजुषा" या सत्राचा उत्तम आस्वाद विद्यार्थ्यांनी घेतला. विद्यार्थ्यांसाठी आयोजित या मनोरंजक अशा प्रश्नमंजुषेचे सूत्रसंचालन डॉ. जयंत चुनेकर यांनी केले.
ब्रह्मचैतन्य ज्योतिष ज्ञानपीठाचे कुलगुरू श्री. राधेश बादले पाटील यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन करून त्यांना पुढील प्रगतीसाठी आपल्या आशीर्वादपर शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ हे फक्त रत्नागिरीतीलच नाही तर जगभरातील विद्यार्थ्यांना ज्योतिषशास्त्रातील सुयोग्य शिक्षण देऊन उत्तम ज्योतिषी तयार करण्याचे महत्त्वाचे कार्य करीत आहे.
या ज्योतिष संमेलनाला मिळालेल्या ज्योतिष अभ्यासकांच्या, तसेच मान्यवरांच्या भरघोस प्रतिसादासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्री. प्रसन्न मुळ्ये यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. तसेच संस्थेच्या विद्यार्थ्यांनी नेहमीच सचोटीने आणि सच्चेपणाने आपले कार्य करीत ज्योतिषशास्त्राच्या साहाय्याने संकटात असलेल्या जातकांचे योग्य व सकारात्मक रितीने समुपदेशन करून त्यांना मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचालन संस्थेचे पदाधिकारी डॉ. जयंत चुनेकर, सौ. विवा साठे आणि सौ. सुप्रिया भारस्वाडकर यांनी केले.
या संमेलनाबरोबरच शनिवार दि. १६ मे रोजी भूगर्भ जलशोध कार्यशाळा घेण्यात आली. नारळ, कॉपर रॉड्स, लोलक इ. विविध साधनांचा वापर करून जमिनीखालील पाण्याचा अचूक शोध कसा घ्यावा याचे मार्गदर्शन डॉ. प्रसन्न मुळ्ये यांनी केले. या कार्यशाळेला महाराष्ट्र, गोवा या राज्यांतील विविध भागातील एकूण २२ अभ्यासकांनी सहभाग घेतला होता.
या दोनही दिवसांच्या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. मधुरा चिंचळकर, सचिव डॉ. चंद्रकांत वाघुळदे, श्री. विवेक साठे, श्री. अभय मुळे गुरुजी, सौ. दिपाली गुरव, डॉ. चंद्रशेखर जोशी, श्री. विलास काणे, श्री. विनोद शर्मा, श्री. दत्तप्रसाद शिरगुरकर, श्री. अमित क्षत्रिय इ. सभासदांनी मोलाचे सहकार्य केले.
