देशाच्या अर्थव्यवस्थेत सहकार क्षेत्राचा मोठा वाटा असावा” – अण्णासाहेब जोल्ले
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
सहकारी संस्थांचे देशभर विस्तार झाले पाहिजेत आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत सहकार क्षेत्राचा मोठा वाटा असावा, असे मत बेळगाव डीसीसी बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांनी व्यक्त केले. कर्नाटकातील गदग जिल्ह्यातील कणगिनाळ येथे सिद्धनगौडा पाटील यांनी पहिली सहकारी संस्था सुरू केली, असेही त्यांनी सांगितले.
शहरातील भावसार सांस्कृतिक भवन येथे आयोजित विजयपूर जिल्हा सौहार्द सहकारी संमेलन व शेअर प्रमाणपत्र वितरण समारंभाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. सहकारी संस्थांमध्ये शासनाचा हस्तक्षेप नसावा., असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रमुख पाहुणे कर्नाटक राज्य सौहार्द संयुक्त सहकारी फेडरेशनचे अध्यक्ष नंजेगौडा यांनी १९९० च्या दशकात सहकार क्षेत्रात अधिकारशाही सुरू झाली होती. त्यातूनच १९९७ चा सौहार्द कायदा अस्तित्वात आला आणि तो २००१ मध्ये लागू झाला. सहकारी संस्थांनी अत्यंत जबाबदारीने कार्य केले पाहिजे. देशाच्या विकासात सहकारी संस्थांची महत्त्वाची भूमिका आहे, असे त्यांनी नमूद केले.
ज्येष्ठ मार्गदर्शक अरविंद जी देशपांडे यांनी सहकारी संस्थांनी जनतेला पारदर्शकता व प्रामाणिकतेने सेवा द्यावी. सर्व सहकारी संस्थांनी सहकारी वक्कूटला सहकार्य करावे. सहकार क्षेत्रात महिलांना ५०% प्राधान्य द्यावे. जिल्हा सहकारी वक्कूट केवळ सहकारी संस्थांपुरते मर्यादित न राहता विविध कार्य कार्यक्रमाचे आयोजन करुन इतर क्षेत्रांनाही सेवा द्यावी, असा सल्ला दिला.
दिव्य सान्निध्य षण्मुखारूढ मठ, विजयपूर व हुबळी येथील शांताश्रमाचे परमपूज्य श्री अभिनव सिद्धारूढ स्वामी यांनी भूषविले होते
विजयपूर सौहार्द सहकारी वक्कूटचे अध्यक्ष संजय पाटील कनमडी यांनी वक्कूटच्या ध्येय व उद्दिष्टे प्रास्ताविकातून मांडली. उपाध्यक्ष चंद्रशेखर कवटगी यांनी स्वागत व परिचय करून दिला.
कार्यक्रमात सहकार रत्न पुरस्कारप्राप्त शंकरगौडा पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच वक्कूटच्या शेअर सदस्यांना शेअर प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमात सहकार भारतीचे राज्य अध्यक्ष प्रभुदेव मगनूर, राष्ट्रीय संयोजक रमेश वैद्यजी, ज्येष्ठ सदस्य सिद्रामप्पा उप्पिन, एम. जी. पाटील, वक्कूटच्या संचालक मंडळ सदस्य अरुण वारद, सुरेश बिरादार, अरुण मठ, सिद्दू मल्लिकार्जुनमठ, आर. डी. कुलकर्णी, चंद्रशेखर पाटील, राजू हंचाटे, यमनप्पा सातीहाल, मलकप्पा रोटी, विवेकानंद शिरोळकर तसेच सहकार भारतीचे पदाधिकारी परशुराम चिंचली आणि दीपक शिंत्रे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनिंग कटावी यांनी केले.
