श्री शिवाजी महाराज सोसायटीच्या वतीने शिवजयंती साजरी
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
येथील प्रतिष्ठित व राज्य पुरस्कारप्राप्त श्री शिवाजी महाराज को-ऑप. क्रेडिट सोसायटी**च्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. संस्थेच्या इमारतीवर अध्यक्ष शंकर कनसे यांच्या हस्ते भगवा ध्वजारोहण करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली.
सोसायटीच्या कार्यालयात तसेच आवारासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कांस्य पुतळ्याला व प्रतिमेला व्यवस्थापन मंडळाच्या सदस्यांनी पूष्पर्पण करून पूजन केले. प्रास्ताविक भाषण करताना उपाध्यक्ष संजय जंबुरे म्हणाले की, भारताच्या इतिहासात धार्मिक, सामाजिक व राजकीय विषयांपेक्षा मानवतेचे श्रेष्ठत्व उंचावणारे महान आणि दूरदर्शी नेते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असलेल्या शिवाजी महाराजांची जयंती अखंड भारतात उत्साहात साजरी केली जाते. तसेच कर्नाटक राज्य सरकारने २०१२ पासून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यातील सर्व शासकीय कार्यालये तसेच शाळा-महाविद्यालयांत साजरी करण्याचा आदेश तत्कालीन मुख्यमंत्री सदानंद गौडा यांनी जारी केला होता, असे त्यांनी सांगितले.
यावेळी विजयपूर महानगरपालिकेचे विभागीय आयुक्त मोहन विठ्ठल जाधव यांचा संस्थेच्या वतीने अध्यक्ष शंकर कनसे व व्यवस्थापन मंडळाच्या सदस्यांनी सत्कार केला. त्यानंतर शहरातील शिवाजी चौकतील महाराजांच्या अश्वरूढ कांस्य पुतळ्यास तसेच शासकीय मराठी शिवाजी शाळेतील कांस्य पुतळ्यास पूष्पर्पण करून पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला संस्थेचे व्यवस्थापन मंडळ सदस्य महादेव पवार, प्रविण बोडके, रामचंद्र चव्हाण, भरत देवकुळे, रवी मदभावी, सौ. अंबुताई जाधव, सुरेखा कदम, व्यवस्थापक संजय जाधव, चंद्रकांत जाधव, अंबादास चव्हाण, विठ्ठल चव्हाण,तसेच कर्मचारी, पिग्मी एजंट आणि सोसायटीचे सदस्य उपस्थित होते.
