पुरपरिस्थिती नियंत्रणासाठी महाराष्ट्र व कर्नाटक संयुक्तपणे उपाययोजना करणे आवश्यक - आ. यशवंतरायगौडा पाटील
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
महाराष्ट्राने भीमा व सिना नदीवर निर्माण करण्यात आलेल्या अवैज्ञानिक बंधारेमुळे विजयपूर जिल्ह्यातील काही भागात पुरपरिस्थिती निर्माण होते या भागातील उपजीविकेला मोठा धक्का बसला आहे. पूर आल्यावर त्याबद्दल विचार करणे पुरेसे नाही. तुंगभद्रा नदीचे व्यवस्थापन आंध्रप्रदेश व कर्नाटक संयुक्तपणे करतात. त्याचप्रमाणे भीमा व सीना नद्यांच्या बाबतीतही कर्नाटक व महाराष्ट्र यांच्यात संयुक्त व्यवस्थापन आवश्यक असल्याचे इंडीचे आमदार यशवंतरायगौडा पाटील यांनी मागणी केली. पूरपरिस्थितीवर लक्ष केंद्रित करून आधीपासूनच महत्त्वाच्या मुद्द्यांची मांडणी करत आलेले आमदार यशवंतरायगौडा यांनी पुन्हा एकदा हे प्रश्न जोरदारपणे सरकारसमोर मांडले. यशवंतरायगौडा पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की,पुरस्थितीच्या व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र सरकारसोबत संयुक्त धोरण आवश्यक असल्याचा पुनरुच्चार केला.
महाराष्ट्र सरकारने अनेक बाबतीत नियमांचे उल्लंघन केले असून, हेही पुरपरिस्थिती गंभीर होण्याचे कारण ठरले आहे. पूर नियंत्रण हे सर्व राज्यांची सामूहिक जबाबदारी असून, पाण्याच्या व्यवस्थापनाकडे केंद्र सरकारने लक्ष देण्याची
आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले
ते पुढे म्हणाले: भाजप नेत्यांनी पुरस्थितीचे हे प्रकरण केंद्र सरकारकडे पोहोचवून मदत जाहीर करून घ्यावी. येथे काँग्रेसची सत्ता असल्यामुळे केंद्रातील भाजप सरकारने दुर्लक्ष करू नये. पूर परिस्थितीस केंद्र सरकारने मदत जाहीर करावी. राज्य व केंद्र सरकारने संयुक्त जबाबदारी स्वीकारून मदतीचे कार्य पार पाडावे.
देश व राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने कहर केला आहे. महाराष्ट्रातील भीमा व सीना नद्यांना मोठा पूर आला आहे. यापूर्वी सीना नदीला एवढा पूर कधीच नव्हता. मात्र, यंदाच्या पुरामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास ढासळला आहे. राज्यात या पुरामुळे अंदाजे १० लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून, त्यापैकी २.२७ लाख हेक्टर क्षेत्र विजयपूर जिल्ह्यात आणि फक्त इंडी तालुक्यातच ९७ हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे, हे शेतकऱ्यांसाठी मोठी चिंतेची बाब आहे.सोन्ना बॅरेजमध्ये यापूर्वी अवैज्ञानिक जलव्यवस्थापन होत होते. मात्र यावेळी वेळीच सर्व दरवाजे उघडून पुराचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुलभूत सुविधांचेही मोठे नुकसान झाले आहे. रस्ते खराब झाले तर अनेक घरे पडली आहेत असे यशवंतरायगौडा पाटील यांनी सांगितले.
ते म्हणाले: चार वेळा जिल्हा परिषद व विधानसभा निवडणुकीत मला जनतेने मतदान केले आहे. त्यामुळे "यशवंतरायगौडा कुठे आहेत?" असे बेंगळुरू किंवा विजयपूरमध्ये बसून विचारण्याऐवजी, मतदारांना विचारले तर उत्तर मिळेल.राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आमच्या सरकारकडे मागणी व आग्रह करतो. केंद्र सरकारचे प्रतिनिधी हे काम पार पाडावे व केंद्रावर दबाव आणावा, असेही त्यांनी सांगितले.
: *आपत्ती व्यवस्थापनासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करावे*
प्रत्येक वेळी पूर आल्यावर कृषी विभागासह विविध विभागांकडून सर्वेक्षण होणे आवश्यक असते. मात्र, कृषी व बागायती विभागात पदे रिक्त आहेत, त्यामुळे पिकांचे नुकसान मोजण्यासाठी अडचणी येऊ शकतात. प्रत्येक आपत्तीच्या वेळी फक्त कृषी विभागावर अवलंबून न राहता, आपत्ती व्यवस्थापनासाठी स्वतंत्र विभाग तयार करावा, तसेच कृषी, बागायती, महसूल विभागांतील रिक्त पदे तातडीने भरावी, अशी मागणी यशवंतरायगौडा पाटील यांनी केली.
