मुखवटे
कवयित्री सुधा बेटगेरी, बागलकोट, कर्नाटक.
बागलकोट येथील कवयित्री सौ. सुधा बेटगेरी यांचा मुखवटे हा काव्यसंग्रह नुकताच वाचनात आला.
कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद, कलबुर्गीचे अध्यक्ष श्री गुरय्या रे स्वामी यांची या काव्यसंग्रहाला प्रस्तावना लाभली आहे. श्री गुरय्या स्वामींनी आपल्या प्रस्तावनेत संग्रहातील कवितांचा सखोल परामर्श घेतला आहे. कविवर्य कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, सुरेश भट, नामदेव ढसाळ या पूर्वसुरींची आठवण त्या निमित्ताने ते जागवतात. सुधाताईंच्या कवितेत या कविवर्यांच्या कवितांचा धागा कुठेतरी त्यांना दिसतो. जेष्ठ पत्रकार श्री दीपक शिंत्रे व तसेच ज्येष्ठ पत्रकार लेखक व समाजसेवक विरभद्र पोतदार यांचा मोलाचा आशिर्वाद, शुभेच्छा रूपाने या काव्यसंग्रहास लाभला आहे.
सुधाताईंचे मनोगतातील पहिलेच वाक्य आहे
'कविता ही माझ्यासाठी केवळ लेखन कला नाही तर ती माझ्या जीवनाचा श्वास आहे"
हे वाक्य, त्या कवितेकडे किती गंभीरपणे पाहतात हे दर्शविते. खरंच र ला ट जोडणे, यमक जुळविणे म्हणजे कविता नक्कीच नव्हे. कवी नेहमी आजूबाजूला पण घडणाऱ्या घटनांवर, आलेल्या अनुभवांवर विचार करतो, चिंतन करतो आणि त्यातून काही निष्कर्षाप्रत येऊन तो कवितेच्या ओळीतून व्यक्त होतो. ती खरी कविता.
पद्यरूपात व्यक्त होता येणं ही कवीला मिळालेली परमेश्वरी देणगी असते. आणि विधात्याकडून मिळालेली अशी देणगी जपून आणि जबाबदारीने वापरायची असते. ही जबाबदारीची जाणीव सुधाताईंच्या कवितांमधून प्रत्यही दिसते.
संग्रहातील कविता समाजाचे, मानवी मनाचे चित्र दाखविणाऱ्या आहेत. त्यातून कवयत्रीचे अंतरंग दिसते.
"किती गोल पण तेवढीच अनमोल आहे भाकरी प्रत्येक गरीब श्रीमंताचे जेवण आहे ही भाकरी "
'अन्न हे पूर्णब्रह्म' या वचनाची सोपी व्याख्या भाकरी या कवितेत दिसून येते.
खरे चेहरे गायब होऊन आता फक्त मुखवट्यांचे राज्य आले आहे, ही मनाला लागणारी बोच, पहिली कविता "मुखवटे" दाखवून देते.
या काव्यसंग्रहात शब्द या संज्ञेवर अनेक कवितांमधून भाष्य करण्यात आले आहे. माणसांचे व्यक्त होण्याचे साधन म्हणजे शब्द. मग ते उच्चारित असोत की लिखित. चांगले शब्द तुम्हाला स्वर्गात घेऊन जातील वाईट शब्द तुम्हाला पातळात गाडतील. आणि कवितेच्या शेवटी
'शब्दांना तोड नाही, शब्द हे निशब्दातही आहेत'
ही ओळ वाचल्यावर
उत्तमो नाति वक्तास्यात् ' या संस्कृत वचनाची आठवण येते.
तिरंगा, भाषा या कविता कवयित्रीच्या मनातील देश प्रेमाची पावती देतात.
'कधीही न सुटावी तुझी साथ आता
मनी चांदण्याचा सडा हा पडावा'
या ओळी आपल्या सख्या विषयीचे ओतपोत प्रेम आणि आदर व्यक्त करतात.
जीवन मृत्यूचा खेळ हा या कवितेतील पहिल्या दोन ओळी
"सरणावरील लाकडांना खंत जळण्याची आहे जगणाऱ्या प्रत्येकाला खंत मरण्याची आहे"
या ओळी वाचल्यावर मला गदिमांच्या ओळी आठवतात,
"जरा मरण यातून सुटला कोण प्राणीजात
दुःखमुक्त जगाला का रे कुणी जीवनात
वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा".
जीवनमृत्यूचे हे तत्त्वज्ञान सुधाताईंनी त्यांच्या पद्धतीने काव्यात चपखलपणे व्यक्त केले आहे.
खरंतर सुधाताईंच्या संग्रहातील प्रत्येक कविता तुम्हाला विचार करायला लावणारी आहे.
'वय' या कवितेतील प्रत्येक ओळ बालपणापासून वृद्धत्वापर्यंतचा प्रवास मोजक्या शब्दात मांडते.
संग्रहावर लिहिण्यासारखं खूप आहे. पण सगळंच इथे लिहिलं तर तुमची कवितासंग्रह वाचण्याची उत्सुकता संपेल. म्हणून,
"कदाचित कधीतरी असंही घडू शकेल"
या कवितेतील चार ओळी देऊन मी थांबतो.
"आनंदाची पिकं उगवतील
सुखाच्या दाण्यांची विक्री होईल
दु:खावर एखादे कीटकनाशक औषध असेल
जीवनाच्या बगीच्या मध्ये सर्वत्र उमंग उत्साह असेल कदाचित कधीतरी असंही घडू शकेल".
सुधाताईंना त्यांच्या काव्यप्रांतातील वाटचालीसाठी मनोमन शुभेच्छा. शुभम् भवतु!!
अनंत जोशी मुलुंड पूर्व मुंबई
