Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

रामनवमी निमित्त सुक्षेत्र शांतिकुटीरमध्ये दिंडी पदयात्रांचा मेळावा

Responsive Ad Here



रामनवमी निमित्त सुक्षेत्र शांतिकुटीरमध्ये दिंडी पदयात्रांचा मेळावा





विजयपुर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे  


श्री समर्थ सद्गुरू गणपतराव महाराज, कन्नूर यांच्या स्थापनेतून सुरु झालेल्या ‘भारतीय सुराज्य संस्थे’च्या ध्येय उद्दिष्टांचा प्रचार-प्रसार करणाऱ्या दिंडी पदयात्रा पथकांचे शांतिकुटीर आश्रमात आगमन झाले. नीती-भक्ती, आदर्श ग्राम आणि स्वदेशी विचारांच्या ज्योती घेऊन ही पथके सुमारे 200 खेडी भेटून ग्रामस्थांना विधायक कार्यासाठी प्रेरित करत आहेत. चैत्र महिन्याच्या रणरणत्या उन्हाची पर्वा न करता, साधारणतः 15 दिवसांपासून भक्तिभावाने सद्गुरूंचा संदेश देत ही पथके आश्रमात पोहोचलली .



या पदयात्रांमध्ये   इंडी तालुक्यातील अर्जनाळ येथील भक्तिकुटीर, जत - रामतीर्थ ककमरी येथील ज्ञानकुटीर, विजयपूर, आलमेल तालुक्यातील बोम्मनहळ्ळी येथील ब्रह्मानंद कुटीर, सोलापूर जिल्ह्यातील गोटेवाडी येथील अध्यात्म कुटीर आणि बार्शी-जरेगाव येथील पथके सहभागी झाले होते.


ही पदयात्रा 1993 साली सुरू झाली असून ती सर्व ग्रामस्थांच्या प्रेम आणि सन्मानास पात्र ठरली आहे. प्रत्येक पथकात सुमारे 120 भक्त सहभागी होते. आज आश्रमात पोहोचताना हातात केसरी पताका, छत्र, चामर, पालखीमध्ये सद्गुरू महाराज, महात्मा गांधीजी यांचे चित्र, तसेच दासबोध ग्रंथ घेऊन, ताल, मृदंग, झांज यासह तार सप्तकात नामघोष करता करता, अनुशासनबद्ध दोन रांगेत पुरुष आणि स्त्रिया वेगवेगळ्या बाजूंनी, देहभाव विसरून "दिंडी यात्रेला येताय का? भक्तीचा अमृतपान करीत आहात का?" असे पद गात, रंगून नाचत, सद्गुरूंच्या निवासस्थानासमोर रस्त्यावरच लांब साष्टांग नमस्कार घालणारे दृश्य अंगावर रोमांच आणणारे होते.

श्रेष्ठ तत्व अंगिकारून, घेतलेलं व्रत पूर्ण झाल्याच्या तृप्तीचे भाव सर्व पदयात्रिकांच्या चेहऱ्यावर दिसत होते. रामनवमी सप्ताहाच्या निमित्ताने सुक्षेत्र शांतिकुटीर, कन्नूर येथे आयोजित 8 दिवसांच्या ज्ञानयज्ञाच्या अंतिम दिवशी दिंडी पथकांनी त्यांनी खेड्यांमध्ये घेतलेल्या कार्यक्रमांची झलक सादर केली.


श्री गणेश नाईक आणि श्री अनंत कुलकर्णी यांनी विमलब्रह्म यावर निरूपणे केली. श्री श्रीकृष्ण संपगावकर यांनी सूत्रसंचालन केले. शांतिकुटीर संदेश त्रैमासिकाचे युगादी ( गुढी पाडवा ) अंकाचे प्रकाशन झाले. भाविकांसाठी निवास आणि प्रसादाची व्यवस्था श्री स.स. गणपतराव महाराज कन्नूर शांतिकुटीर कन्नूर ट्रस्टचे कार्यकारी समितीचे सदस्य, तसेच सद्गुरू सेवा समितीचे अध्यक्ष व सदस्य यांनी केली.


शांतिकुटीर ट्रस्टचे अध्यक्ष श्री गोविंद बाहेती शेट आणि कर्नाटक व महाराष्ट्रातून आलेले हजारो भक्तही या प्रसंगी उपस्थित होते.