अमरलता कार्यक्रमात तीनशे मंडळींची हजेरी
मुंबई/ प्रतिनिधी
"समृद्ध सावंत (पटेल) समाज" आयोजित "अमरलता" या कार्यक्रमात समाजातील जवळपास २५० ते ३०० मंडळींनी दादर माटुंगा कल्चर सेंटर येथे ता. २५ जानेवारीला सायंकाळी ४.३० वाजल्या पासून सहभाग नोंदविला. महिलांच्या हळदी कुंकू कार्यक्रमाने सुरुवात करत सायंकाळी ६ वाजता डॉ मृदुला दाढे यांच्या "अमरलता" मराठी हिंदी चित्रपट संगीत व भाव गीतांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमा दरम्यान डॉ मृदुला दाढे यांनी लता दीदींच्या गान शैली चे कौतुक करताना सांगितले की
"कष्टात घालवलेले बालपण म्हणजे लता नाही.
पराकोटीचा गोड आवाज म्हणजे लता नाही.
हवा तिथे हवा तसा पोचू शकणारा गळा म्हणजे लता नाही.
अवघड जागा लीलया घेऊ शकण्याची क्षमता म्हणजे लता नाही.
प्रत्येक सूक्ष्म भावना आवाजातून व्यक्त करण्याची दिव्य शक्ती म्हणजे लता नाही.
गोड परंतु बोबडे नाहीत ,स्पष्ट परंतु कोरडे नाहीत, असे उच्चार म्हणजे लता नाही.
प्रत्येक अभिनेत्रीला तिच्या आवाजाला शोभेल असा आवाज देणे म्हणजे लता नाही.
लता मंगेशकर म्हणजे या सर्व घटकांचं एक प्रमाणबध्द मिश्रण आहे.
सदर कार्यक्रमास सावंत पटेल समाजातील उद्योगपती श्री बि डि सावंत व माजी आमदार श्री विजय सावंत साहेब उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण सावंत यांनी केले व सुहास सावंत यांनी आभार मानले त्यांना श्याम सावंत यांचे सहकार्य लाभले.
