२९ डिसेंबरला प्रल्हाद नलावडे स्मृती मोफत शालेय कॅरम स्पर्धा
मुंबई/ क्रिडा प्रतिनिधी- बाळ तोरसकर
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे कॅरमप्रेमी स्व. प्रल्हाद नलावडे यांच्या चतुर्थ स्मृतीदिनानिमित्त १५ वर्षांखालील शालेय मुला-मुलींसाठी विनामूल्य एकेरी कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २९ डिसेंबर रोजी को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियन-मुंबई आणि अविनाश स्पोर्ट्स यांच्या सहकार्याने होणार आहे.
स्पर्धेतील पहिल्या आठ विजेत्या-उपविजेत्यांना स्ट्रायकरसह आकर्षक पारितोषिके देऊन गौरविण्यात येईल, अशी माहिती संयोजक लीलाधर चव्हाण यांनी दिली.
ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे यांच्या सहकार्याने या स्पर्धेतील पहिल्या आठ सबज्युनियर कॅरमपटूंना १५ वर्षांखालील सुपर लीग कॅरम चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी थेट प्रवेश दिला जाणार आहे. राज्य क्रीडा दिनानिमित्त आयोजित ही स्पर्धा आणि मोफत मार्गदर्शन सत्र दादर-पश्चिम येथील को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियन-मुंबई सभागृहात होईल.
इच्छुक शालेय विद्यार्थी २२ डिसेंबरपर्यंत प्रवेशासाठी किंवा अधिक माहितीसाठी अविनाश नलावडे (९९८७८ ३१६२२) किंवा चंद्रकांत करंगुटकर यांच्याशी संपर्क साधू शकतात.
स्व. प्रल्हाद नलावडे यांनी स्थानिक कॅरम खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विनामूल्य स्ट्रायकर वाटप केले होते. विशेषतः आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून झालेल्या पहिल्या मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेमध्ये अनेक खेळाडूंना त्यांनी कॅरम स्ट्रायकर देऊन प्रेरित केले होते. त्यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नरेंद्र वाबळे आणि शेकडो पालकांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले होते.
