मलाही ‘डिजिटल अरेस्ट’चा प्रयत्न; मंत्री डॉ. एम. बी. पाटील यांचा खुलासा
**सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांना सतर्कतेचे आवाहन; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिसांना वैयक्तिक बक्षीस देणार**
विजयपुर /प्रतिनिधि - दिपक शिंत्रे
राज्याचे अवजड व मध्यम उद्योगमंत्री डॉ. एम. बी. पाटील यांनाही डिजिटल अरेस्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक अनुभव त्यांनी उघड केला. बेळगाव येथे विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना सीबीआय आणि ईडी अधिकारी असल्याचे भासवून फोन करण्यात आला होता. मात्र, हा बनावट फोन असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
डिजिटल अरेस्ट, ब्लॅकमेलिंग आणि सायबर फसवणुकीच्या जाळ्यात निष्पाप नागरिक अडकत असून, नागरिकांनी अशा फोन कॉल्सना बळी पडू नये आणि सतर्क राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
विजयपूर जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात चोरीच्या विविध प्रकरणांत शोधून काढलेला मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आला. यावेळी मंत्री पाटील यांनी तक्रारदारांशी संवाद साधून चोरीच्या घटनांची माहिती घेतली.
शाळा-महाविद्यालयांमध्ये तक्रार पेट्या बसविण्याचा पोलिसांचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगून, प्रत्येक शाळेत अशी व्यवस्था असावी, असे त्यांनी नमूद केले. तसेच घरांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासह नागरिकांनी स्वतःही दक्षता घ्यावी, असे आवाहन केले.
**पोलिसांना वैयक्तिक बक्षीस देणार**
चोरीचा कोट्यवधींचा मुद्देमाल शोधून काढणाऱ्या आणि सायबर गुन्ह्यांची उकल करणाऱ्या पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करून, उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलिसांना प्रशस्तिपत्रांसह वैयक्तिक बक्षीस देण्याचा विचार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. के. आनंद, जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कट्टीमनी यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.
