सोलापूर जनता सहकारी बँकेच्या विजयपूर शाखेचा ११ वा वर्धापन दिन व दिवाळी स्नेह-फराळ सोहळा उत्साहात संपन्न
विजयपूर / प्रतिनिधी — दिपक शिंत्रे
सोलापूर जनता सहकारी बँक लि., विजयपूर शाखेचा ११ वा वर्धापन दिन व दिवाळी स्नेह-फराळ सोहळा विजयपूर येथील हॉटेल मधुवन येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमास विजयपूरचे माननीय खासदार रमेशजी जिगजिणगी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या प्रसंगी माजी आमदार सोमणगौडा पाटील (सासनूर), उपमहापौर सौ. सुमित्रा जाधव, स्टेट सौहार्द फेडरेशनचे संचालक संजय पाटील, स्टेट कन्झ्यूमर फेडरेशनचे संचालक भालचंद्र मुंजनेनी, नगरसेवक तथा स्टेट फिल्म फेडरेशनचे उपाध्यक्ष राजशेखर मगीमठ, जिल्हा सहकारी बँक लि.च्या अध्यक्षा सौ. सौम्या कल्लूर, श्री महालक्ष्मी को-ऑप बँकेचे उपाध्यक्ष विकास पडकी, विजयपूर सहकारी बँकेचे अध्यक्ष सी.ए. एस. जी. पाटील, श्री छत्रपती शिवाजी को-ऑप बँक लि.चे सरव्यवस्थापक संजय जाधव, गर्व्हमेंट एम्प्लॉईज को-ऑप बँकेचे अरुण लमाणी, दानम्मादेवी टेम्पल ट्रस्ट, गुड्डापूरचे अध्यक्ष विजुगौडा पाटील, भाजप बेळगावी विभाग प्रभारी चंद्रशेखर कवटगी, उद्योजक राजू बिज्जरगी, सहकार भारतीचे जिल्हा जनरल सेक्रेटरी . पी. के. चिंचली, जिल्हा संघटना सचिव व पत्रकार दीपक शिंत्रे, भारतीय किसान संघाचे राज्याध्यक्ष बी. एम. कोकरे, धन्वंतरी हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. सुनील कल्लूर, जिल्हा भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. स्वप्ना कण्णमुचनार आणि इंजिनीअर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष . अरुण मठ यांच्यासह अनेक मान्यवर, ग्राहक, सभासद व हितचिंतक उपस्थित होते.
बँकेच्या वतीने अध्यक्ष सुनील पेंडसे, संचालक पुरुषोत्तम उडता, संचालक तथा विजयपूर शाखेचे संपर्क संचालक प्रमोद भुतडा, संचालक सुरेश चिक्कळी, संचालक महादेव न्हावकर, संचालक ॲड. मल्लिनाथ शहाबादे, सरव्यवस्थापक देवदत्त पटवर्धन, सहायक सरव्यवस्थापक तथा विजयपूर शाखेचे संपर्क अधिकारी रमेश मामड्याल, चीफ ऑफिसर मल्लिनाथ खुने, जनसंपर्क अधिकारी मधुकर मोरे, विजयपूर शाखा व्यवस्थापक गणेश हेगडे व बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले. त्यानंतर बँकेचे सरव्यवस्थापक देवदत्त पटवर्धन यांनी उपस्थित ग्राहक, सभासद व हितचिंतकांचे स्वागत केले.
चीफ ऑफिसर मल्लिनाथ खुने यांनी बँकेची स्थापना, बँकेचा ६० वर्षांचा गौरवशाली इतिहास, आजवरची प्रगती आणि सध्या बँकेने गाठलेला ३,००६ कोटी रुपयांचा एकूण व्यवसाय याबाबत सविस्तर माहिती दिली. विजयपूर शाखेचे शाखा व्यवस्थापक गणेश हेगडे यांनी बँकेच्या विविध ठेव योजना व कर्ज योजनांची माहिती उपस्थितांना दिली.
बँकेचे सन्माननीय खातेदार अरुण वारद यांनी बँकेच्या उत्कृष्ट ग्राहकसेवेबद्दल समाधान व्यक्त करत आपले मनोगत मांडले. तसेच उपस्थित नागरिकांनी बँकेच्या विविध सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
यानंतर बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यांनी बँकेच्या कार्याची माहिती देतानाच बँकेने साधलेली प्रगती, सुरू असलेले नवनवीन उपक्रम आणि आगामी तंत्रज्ञानाधारित विकास योजनांबाबत मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुणे खासदार रमेशजी जिगजिणगी यांनी बँकेच्या उल्लेखनीय प्रगतीचे कौतुक केले. बँकेने अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत ०% नेट एन.पी.ए. (अनुत्पादित कर्जे) साध्य केल्याबद्दल त्यांनी बँकेचे विशेष अभिनंदन केले. तसेच बँकेच्या पुढील वाटचालीसाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी उपस्थितांना सध्याच्या बँकिंग क्षेत्रातील घडामोडींबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईरण्णा तोंडीकट्टी यांनी केले, तर आभार प्रदर्शन चंद्रशेखर कवटगी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता दिवाळीनिमित्त आयोजित स्नेह-फराळाने झाली.
सोलापूर जनता सहकारी बँक लि., विजयपूर शाखा ही सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजयपूर येथे गेल्या दहा वर्षांपासून ग्राहकांच्या सेवेत कार्यरत आहे. शाखेमध्ये विविध प्रकारच्या ठेव व कर्ज योजना उपलब्ध असून, विजयपूर व परिसरातील नागरिकांनी बँकेच्या आर्थिक सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. सहकार क्षेत्रातील विश्वास, उत्तम ग्राहकसेवा आणि आधुनिक बँकिंग सुविधांच्या माध्यमातून विजयपूर शाखा ग्राहकांच्या आर्थिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत आहे.
