सौहार्द कायद्याच्या चौकटीत राहून सहकारी संस्थांनी विकास साधावा : नंजणगौडा
विजयपूर येथे सौहार्द सहकारी संस्थांची संपर्क सभा उत्साहात
विजयपूर/ प्रतिनिधि -दिपक शिंत्रेे
सौहार्द सहकारी संस्थांनी सौहार्द कायद्याच्या चौकटीत राहून सभासदांना उत्तम सेवा देत संस्थेचा सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन कर्नाटक राज्य सौहार्द संयुक्त सहकारी संस्थेचे अध्यक्ष जी. नंजणगौडा यांनी केले.
विजयपूर शहरात जिल्ह्या तील सौहार्द सहकारी संस्थांसाठी आयोजित "सौहार्द सहकारी संस्थांची संपर्क बैठक" या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी नंजणगौडा म्हणाले, "सहकारी संस्थेचे पदाधिकारी हे मोठ्या जबाबदारीच्या पदावर असतात. संस्थेने दिलेल्या कर्जाची योग्य वेळी परतफेड झाली नाही तर कायद्यानुसार संचालक मंडळाची जबाबदारी निश्चित होते. त्यामुळे पारदर्शक कारभार, आर्थिक शिस्त आणि सभासदांना चांगली सेवा देणे आवश्यक आहे."
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौहार्द संयुक्त सहकारी संस्थेचे संचालक संजय ब. पाटील होते. त्यांनी बोलताना जिल्ह्यातील सर्व सौहार्द सहकारी संस्थांची जबाबदारी वाढली असून, परस्पर सहकार्याच्या भावनेतून काम करून सहकार चळवळ मजबूत करण्याचे आवाहन केले. तसेच जिल्हा सौहार्द सहकारी संस्थांच्या संघटनेची उद्दिष्टे व कार्यपद्धती याबाबत मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले कर्नाटक सरकारचे माजी मंत्री व श्री सौहार्द सहकारी संस्था विजयपूरचे अध्यक्ष अप्पासाहेब पट्टणशेट्टी यांनी आपल्या २० वर्षांच्या सहकारी क्षेत्रातील अनुभवांची माहिती दिली. सहकारी संस्थांनी कर्ज वितरण आणि वसुली प्रक्रियेत अधिक दक्षता घेतल्यास संस्थांचा चांगला विकास होईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी कर्नाटक राज्य सौहार्द सयुंक्त सहकारी संस्थेचे माजी व संचालक सुभाष इंडी यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना प्रांतीय अधिकारी बसवराज होंगल यांनी केली. उद्घाटनानंतर अध्यक्ष जी. नंजणगौडा यांनी सौहार्द सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व सूचना जाणून घेतल्या.
दुपारच्या सत्रात पीएफ सल्लागार के. डी. नाडगेरी यांनी सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींना पीएफ व ईएसआय संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रतिभा मठ यांनी केले. मान्यवरांचे स्वागत सौहार्द विकास अधिकारी बसवराज एस. यांनी केले.
या बैठकीस ज्येष्ठ सहकारी अरुण वारद, परशुराम चिंचली, दिपक शिंत्रे, सिद्धू मल्लिकार्जुनमठ, यमनप्पा सातिहाळ, चडचणचे चंद्रशेखर पाटील, ताळिकोटीचे राजू हंचाटे, आर. डी. कुलकर्णी (सिंदगी), विवेकानंद शिरोळकर, बी. एस. पाटील (इंडी) तसेच जिल्ह्यातील विविध सौहार्द सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
