अनक्रु यांच्या 'सध्याराग' कादंबरीमुळे बीची यांना कन्नड वाचनाची प्रेरणा मिळाली - निवृत्त न्यायमूर्ती नरहरी मराठे
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
इंग्रजी साहित्याचा गाढ प्रभाव असलेल्या हास्यब्रह्म बीची यांचे कन्नड साहित्याबद्दलचे मत अनक्रु यांच्या ‘संध्याराग’ कादंबरीचे वाचन केल्यानंतर बदलले, असे निवृत्त न्यायमूर्ती नरहरी मराठे यांनी सांगितले.
शहरातील भाजपा कार्यालय भवन येथे अखिल भारतीय साहित्य परिषद आयोजित ‘हास्यब्रह्म बीची साहित्य’ या व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते. पत्नीच्या आग्रहास्तव बीची यांनी अनक्रु यांची ‘संध्याराग’ कादंबरी वाचली आणि त्यानंतर त्यांची कन्नड साहित्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली, असे त्यांनी नमूद केले.
बीची यांनी ‘तिम्म’ या पात्राची निर्मिती करून समाजातील उणिवा हलक्या-फुलक्या विनोदातून मांडल्या. ‘सुधा’ साप्ताहिकामधील वाचकांच्या प्रश्नांना ते देत असलेली ‘उत्तरभूप’ ही सदरमालिका अत्यंत लोकप्रिय झाली होती. चित्रपटांसाठी संवाद लेखनाच्या अनेक संधी येऊनही त्यांनी त्या नाकारल्या. मात्र, एकदा आर्थिक गरज निर्माण झाल्याने त्यांनी ‘शुभमंगल’ चित्रपटासाठी संवाद लेखन केले, अशी माहितीही त्यांनी दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभासापचे जिल्हाध्यक्ष विवेक कुलकर्णी होते. प्रास्ताविक श्रीरंग कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. चिदंबर पाटील यांनी केले. स्वागत व परिचय आनंद गोडसे यांनी करून दिला, तर आभार प्रदर्शन विद्यावती बेण्णूर यांनी केले.
या कार्यक्रमास सुधीर टंकसाळे, सुकांत कुलकर्णी, बळवंत कुलकर्णी, अनिल बलुंडगी, श्रीरंग पुराणिक, मयूर तिळगुळकर, सौम्या कुलकर्णी, राहुल मरळी, आनंद कुलकर्णी, सुभाष यादवाड, डॉ. व्ही. डी. आयहोळी, माधव कुलकर्णी, भारती गोडसे, केशव कुलकर्णी आदींसह अनेक साहित्यप्रेमी उपस्थित होते.
