विद्युत प्रवाहाचा स्पर्श होऊन दोन हजार झाडे जळून खाक
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
इंडी तालुक्यात आलेल्या जोरदार वादळामुळे सावलसंग वनक्षेत्रातील दोन हजारांहून अधिक झाडे जळून खाक झाली.
इंडी तालुक्यातील सावलसंग डोंगरावर मैत्रा वायू कृष्णा लिमिटेड या खासगी कंपनीकडून पवनचक्कीद्वारे वीज निर्मिती केली जाते. वीज यंत्रांचे खांब आणि तारा वनक्षेत्रातून गेलेल्या आहेत. जोरदार वारा आणि पावसामुळे विद्युत प्रवाहाचा स्पर्श होऊन अंदाजे २००० हून अधिक झाडे जळून खाक झाली आहेत.
वीज निर्मितीनंतर ही वीज वनक्षेत्रातून इतर ठिकाणी पाठवली जाते. अनेक वेळा वनक्षेत्रातून वीज वाहिन्या नेऊ नयेत, अशी लेखी तसेच तोंडी विनंती करण्यात आली होती. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही, अशी माहिती विभागीय वन अधिकारी मंजुनाथ धुळे यांनी दिली.
या आगीत अनेक पक्षी आणि प्राणी — ससे, मुंगूस, रानडुक्कर, मांजरे, साप आदींचा मृत्यू झाला असून पक्ष्यांची घरटीही जळाली आहेत.
कायदा उल्लंघन आणि वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून इंडी वन विभागात प्रकरण नोंदविण्यात आले आहे.
घटनास्थळी उपविभागीय वन अधिकारी शिवरुद्रप्पा कबाडगी यांनी भेट दिली.
इंडी येथून अग्निशमन दल वेळेत पोहोचून आग विझविण्यास मदत केली. अन्यथा आणखी मोठी दुर्घटना घडली असती, असे मंजुनाथ धुळे यांनी सांगितले.
फोटो:-
इंडी : तालुक्यातील सावलसंग डोंगरावरील वनक्षेत्रात जळालेली झाडे.
