विजयपुरात १७ मे ते २५ मे दरम्यान राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
विजयपूर शहरात १७ मे ते २५ मे दरम्यान राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कर्नाटक बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष कुमार बंगारप्पा यांनी दिली.
राज्यस्तरीय स्पर्धेत १३ वर्षे आणि १७ वर्षांखालील मुलं आणि मुली यांच्या गटात सामने खेळवले जातील, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील सुमारे एक हजार खेळाडू स्पर्धेत सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. पुढील आठवड्यापासून स्पर्धेसाठी नोंदणी सुरू होणार आहे. दररोज सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सामने होतील. पहिल्या चार दिवसांत पात्रता फेऱ्या होतील आणि त्यानंतर अंतिम फेरीत विजेतेपदासाठी सामने होतील, असे त्यांनी सांगितले.
विजयपूरमध्ये प्रथमच बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यासाठी आवश्यक सहकार्य द्यावे, अशी विनंती मुख्यमंत्री सिद्धरामय्या, जिल्हा पालकमंत्री एम. बी. पाटील, स्थानिक आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ, तसेच जिल्हा प्रशासन आणि स्थानिक क्रीडा संघटनांना करण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
आतापर्यंत राज्यात फक्त बेंगळुरू, म्हैसूर आणि मंगळुरू येथेच बॅडमिंटन स्पर्धा आयोजित केल्या जात होत्या. उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा नसल्यामुळे स्पर्धा आयोजित करणे शक्य झाले नव्हते. मात्र, ग्रामीण भागात बॅडमिंटनला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने प्रथमच विजयपूरमध्ये स्पर्धा आयोजित केली जात आहे, असे त्यांनी सांगितले.
स्पर्धेसाठी मिळणारा प्रायोजक निधी विजयपूरमध्ये बॅडमिंटनच्या विकासासाठी वापरण्यात येणार आहे. स्पर्धेदरम्यान सवलतीच्या दरात बॅडमिंटन साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी खासगी कंपन्यांशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला राज्य सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष राजू बिरादार, माजी मंत्री अप्पू पटनशेट्टी, मल्लनगौडा बिरादार, जिल्हा युवा सबलीकरण आणि क्रीडा विभागाचे सहाय्यक संचालक राजशेखर दैवाडी, विजयपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष बिदरी, अरुण माचप्पनवर आणि इतर उपस्थित होते.
