ग्रामपंचायतीचे माजी सदस्य राजू खरे खून प्रकरणी सहा आरोपींना अटक
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
शहराच्या बाहेरील अलियाबाद परिसरातील गोल्डन दड्डी जवळ 14 एप्रिल मंगळवारी रोजी भरदिवसा झालेल्या ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व रिअल इस्टेट व्यवसाय करणारे राजू बापू खरे यांच्या खून प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी दिली.
शहरातील एसपी कार्यालयाच्या परिसरातील समुदाय भवनात शुक्रवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, या खून प्रकरणात सहभागी असलेले अलियाबाद येथील वागीश शंकर पोल (वय 31), पांगून दड्डी येथील अबुशा सोपान कोडलेकर (वय 36), जालिंदर उर्फ पॉपट मल्लारी हक्के (वय 29), मुरगु (मरगु) उत्तम हक्के (वय 24), मानें दड्डी येथील अबाश्या बालू माने (वय 35) तसेच अलियाबाद एल.टी. नं.1 येथील खंडूबा (अजीत) गुंडिबा तांबे उर्फ हक्के (वय 29) या सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या आरोपींना बबलेश्वर तालुक्यातील खिलारहट्टी आणि इंडी तालुक्यातील क्यातनकेरी गावांतून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून परवान्याशिवाय असलेली 2 देशी पिस्तुले, 7 मोबाईल, गुन्ह्यात वापरलेल्या 2 दुचाकी, 1 टिपर आणि 1 कार जप्त करण्यात आली आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकी तिकोटा तालुक्यातील टक्कळकी आणि सोलापूर रेल्वे स्थानकाजवळून हस्तगत करण्यात आल्या.
खून झालेल्या राजू बापू खरे हे 14 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आपल्या गोल्डन दड्डी गावाहून विजयपूरकडे थार कंपनीच्या कारने येत होते. यावेळी मार्गातील अलियाबाद इंडस्ट्रियल परिसरातील श्री धरिदेवर पेट इंडस्ट्रियल गोदामासमोर समोरून आलेल्या आरोपींच्या टिपर वाहनाने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. त्याचवेळी 2 दुचाकींवरून आलेल्या इतर आरोपींनी त्यांचा मार्ग अडवून कारमध्येच दगडांनी मारहाण केली आणि नंतर पिस्तुलातून गोळ्या झाडून गंभीर जखमी करून त्यांची कारमध्येच हत्या करून तेथून पळ काढला, असे एसपी निंबरगी यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आरोपींचा शोध घेण्यासाठी अतिरिक्त पोलिस अधीक्षक रामनगौडा हत्ती यांच्या मार्गदर्शनाखाली आयपीएस अधिकारी इतीशा गुप्ता, विजयपूर ग्रामीणचे डीएसपी टी. एस. सुल्पी, पीआय आर. एस. जानर, पीएसआय विनोद दोडमनी, पीएसआय लक्ष्मी देगिणाळ तसेच कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या दोन स्वतंत्र पथकांची स्थापना करून जलद आणि प्रभावी कारवाई करण्यात आली.
या तपास पथकाच्या कार्याचे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी कौतुक केले आहे.