लोकायुक्तांच्या जाळ्यात दोन शासकीय कर्मचारी लाच स्वीकारताना अटक
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
विजयपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात कार्यरत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना लाच स्वीकारताना लोकायुक्त पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे.
फिर्यादीने विजयपूर लोकायुक्त पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडशी संबंधित पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी जागेच्या नकाशाला मंजुरी देण्यासाठी द्वितीय श्रेणी सहाय्यक अरविंद पवार आणि संगणक ऑपरेटर अयुब तोनश्याळ यांनी ₹15,000 लाचेची मागणी केली होती.
या तक्रारीच्या आधारे लोकायुक्त पोलिसांनी आज दुपारी ट्रॅप कारवाई करून आरोपींना लाच घेत असताना पकडले. लाचेची रक्कम जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई कर्नाटक लोकायुक्त विजयपूर येथील पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस उपअधीक्षकांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
