मुद्देबिहाळ येथे गारपिटासह पाऊस : वाहतूक विस्कळीत, पिकांचे मोठे नुकसान
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
जिल्ह्यातील. मुद्देबिहाळ तालुक्यातील मुद्देबिहाळ शहरासह बिदरकुंदी आणि आसपासच्या गावांमध्ये मंगळवारी सायंकाळी अचानक झालेल्या गारपिटीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. वाऱ्यासह सुरू झालेली ही गारपीट अर्ध्या तासाहून अधिक काळ सुरू राहिला .पावसासोबत पडलेल्या मोठ्या गारांनी घरांच्या छपरांवर, वाहनांवर आणि शेतीपिकांवर मोठे नुकसान केले. अनेक ठिकाणी पत्र्यांच्या घरांचे छप्पर खराब झाले. शेतांमध्ये शेतकऱ्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पिकांचे नुकसान पाहून हळहळ व्यक्त केली. कापूस, ज्वारी, गहू यांसारखी विविध पिके जमीनदोस्त झाली असून आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना हा आणखी मोठा धक्का बसला आहे.
गारपिटीमुळे रस्त्यांवर बर्फासारख्या गारा साचल्याचे चित्र दिसून आले तर काही नागरिकांनी त्या गारा गोळा करतानाही दिसून येते होते. वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून काही काळ वाहनांची हालचाल पूर्णपणे ठप्प झाली. प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. काही ठिकाणी दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटनाही घडल्या.काही गावांमध्ये झाडे उन्मळून पडल्यामुळे वीजवाहिन्या तुटल्या आणि वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे गावांमध्ये अंधार पसरला. वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्तीचे काम सुरू केले, तरी काही ठिकाणी रात्रीपर्यंत अडचणी कायम होत्या. नागरिकांनी दुकाने आणि घरांमध्ये आसरा घेतला आणि काही काळ बाहेर पडण्यास टाळले, स्थानिकांच्या मते, गेल्या काही वर्षांत इतक्या तीव्र स्वरूपाची गारपीट क्वचितच पाहायला मिळाली आहे. हवामानातील बदलांमुळे अशा अचानक नैसर्गिक आपत्ती घडत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
शेतकऱ्यांनी सरकारचे लक्ष वेधून तातडीने नुकसानाचा पंचनामा करून मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. तसेच पिक विमा योजना सुलभ करून बाधित शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
अशा परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहून पावसाच्या वेळी अनावश्यक बाहेर पडू नये, मजबूत आसऱ्यात राहावे, वीज खांबांपासून दूर राहावे आणि मुलांना सुरक्षित ठेवावे, असे आवाहन करण्यात आले.
एकूणच, मुद्देबिहाळ तालुक्यात झालेल्या या गारपिटीने निसर्गाचा रौद्ररूप पुन्हा एकदा दाखवून दिले असून जनजीवन आणि शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आता सरकारकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा शेतकरी आणि नागरिक व्यक्त करत आहेत.

