तीन लाख रुपयांच्या सिगारेट आणि पान मसाल्याची चोरी
विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
जिल्ह्यातील इंडी शहरात चोरट्यांचा उपद्रव वाढला असून इंडी शहरातील महावीर सर्कल येथील प्रमोद ट्रेडर्स या दुकानात चोरीची घटना घडली आहे. हे दुकान वीरेंद्र पांद्रे यांच्या मालकीचे आहे.
प्रमोद ट्रेडर्समधून ५ हजार रुपये रोख रक्कम तसेच सुमारे ३ लाख रुपयांच्या सिगारेट आणि पान मसाल्याची चोरी करण्यात आली आहे. चोरी केल्यानंतर चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर देखील घेऊन फरार झाले आहेत
घटनास्थळी इंडी शहर पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली आहे. परिसरात चोरीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी चोरट्यांना लवकरात लवकर पकडून अटक करण्याची मागणी केली आहे.
तीन वर्षांपूर्वी याच प्रमोद ट्रेडर्स दुकानाला अज्ञात व्यक्तींनी आग लावली होती, ज्यात सुमारे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले होते. आता ही चोरी देखील मुद्दाम केली असल्याचा संशय दुकानमालकांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणी इंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.