विजयपूर, जिल्हातील इंडी उपविभागात 3 वर्षांतील चोरी प्रकरणांचा उलगडा; 42 आरोपी अटकेत, 1.20 कोटींचा मुद्देमाल जप्त
विजयपूर /प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
इंडी उपविभागाच्या हद्दीत गेल्या तीन वर्षांत घडलेल्या विविध चोरी प्रकरणांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून, सोने-चांदीचे दागिने, जेसीबी, पिकअप, स्कॉर्पिओ, ट्रॅक्टर आदींसह सुमारे 1.20 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणांमध्ये आंतरराज्य चोरांसह एकूण 42 आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी दिली.
गुरुवारी शहरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. इंडी परिसरात मंदिर, वाहने, घरे, फायनान्स संस्था, जनावरे, मेंढ्या, पंपसेट चोरी तसेच लूट व दरोडा प्रकरणे घडली होती. या सर्व प्रकरणांचा तपास करून पोलिसांनी मोठी कारवाई केली असल्याचे त्यांनी सांगितले.
चडचण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिराडोण गावातील बिरप्पा मंदिराचे कुलूप तोडून मूर्तीवरील तसेच तिजोरीतील सुमारे 6.51 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. या प्रकरणात महाराष्ट्रातील नागेश मधुकर भोसले याला अटक करून 6.42 लाख रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले.
2 मार्च 2026 रोजी टाकळी गावात मल्लिकार्जुन रामचंद्र तेली यांची पिकअप गाडी चोरीला गेली होती. या प्रकरणात महाराष्ट्रातील विशाल ठाणाजी मोळे याला वाहनासह अटक करण्यात आली.
सिंदगी तालुक्यातील यरगळ बीके गावात लक्ष्मी शरणप्पा तळवार यांच्या घरातून 4.50 लाख रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले होते. या प्रकरणात महाराष्ट्रातील शंकर उर्फ ईश्वर उर्फ काशीनाथ उर्फ लिंगम भोसले याला अटक करून 6.80 लाख रुपये किमतीचे 162.930 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले.
8 फेब्रुवारी 2026 रोजी आलमेल बसस्थानकात सविता काशिराय तोरवी यांची सोन्याची चैन लुटण्याच्या प्रकरणात महाराष्ट्रातील दीप परशुराम माळी, अरमान बाबू मिथडे, प्रकाश रामचंद्र मातंगी, कुनाल कुलदीप सालुंके आणि हर्षद उर्फ ओंकार राजासिंग बडगुजर यांना अटक करून 2.90 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आलमेल येथील दानेश्वरी फायनान्समध्ये 27.78 लाख रुपये चोरीच्या प्रकरणात फायनान्स व्यवस्थापक सोमनाथ पुजारी आणि सिपाई चंद्रशेखर कुपेंद्र गौंडी यांना अटक करून 11 लाख रुपये जप्त करण्यात आले.
कलकेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोलगेरी गावात घरासमोर उभी असलेली जेसीबी चोरीला गेली होती. या प्रकरणात महाराष्ट्रातील शिवाजी रायतमुरे आणि हूवण्णा बंडगार यांना अटक करून जेसीबी आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली.
5 डिसेंबर 2025 रोजी होर्ती येथे झालेल्या सोन्याच्या साखळी चोरी प्रकरणात उत्तर प्रदेशातील पुष्पेंद्र गुंधारी दोहिरे याला अटक करून 2.60 लाख रुपये किमतीची साखळी जप्त करण्यात आली.
तसेच पोलिसांच्या वेशात लारी अडवून चालक व क्लीनरला मारहाण करून लूट केल्याच्या प्रकरणात 9 जणांना अटक करून लारी व 1.25 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले. लारीतील सुमारे 8.25 लाख रुपये किमतीचे 600 तांदळाच्या पोत्यांचेही प्रकरण उघडकीस आले.
झळकी येथील जेवूर गावाजवळ संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या तिघांकडून 1.50 लाख रुपये किमतीचे 31 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले.
अंजुटगी गावात 25 सप्टेंबर 2025 रोजी भागण्णा मलकारी इनूर यांच्या शेडमधून 8 मेंढ्यांची चोरी झाली होती. या प्रकरणात महाराष्ट्रातील मारुती सोमन्निंग माळी आणि इंडी तालुक्यातील कुदगी गावातील प्रवीण अशोक मैनळी यांना अटक करून मेंढ्या व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले.
जिल्हा पोलिसांनी विविध प्रकरणांचा यशस्वी तपास करून आरोपींना अटक केली असून त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेत एएसपी रामनगौडा हत्ती, इंडी डीएसपी सदाशिव कट्टीमणी आदी उपस्थित होते.

