विजयपूरमध्ये विमान कोसळले, दोनजन जखमी
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
नुकतीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची धक्कादायक बातमी चर्चेत असतानाच, विजयपूर जिल्ह्यात एक हलके प्रशिक्षण विमान कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
जिल्ह्यातील बबलेश्वरजवळ असलेल्या मंगळूरू गावात हे प्रशिक्षण विमान इंधन संपल्यामुळे किंवा अन्य तांत्रिक बिघाडामुळे जमिनीवर कोसळल्याची माहिती आहे.
विमानात प्रशिक्षण देणारे सहाय्यक फ्लाइट इन्स्ट्रक्टर कॅप्टन कुणाल मल्होत्रा आणि प्रशिक्षणार्थी वैमानिक गौतम संकर हे जखमी झाले असून, त्यांना अधिक उपचारांसाठी विजयपूर येथील बीएलडीई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वैमानिक प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या रेड बर्ड एव्हिएशन संस्थेचे ‘सेस्ना १७२ टँगो चार्ली’ हे विमान कलबुर्गीहून बेळगावकडे जात असताना बबलेश्वरजवळील मंगळूरू गावात कोसळले.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ जखमींच्या मदतीस धाव घेतली. त्यांना त्वरित रुग्णवाहिकेद्वारे विजयपूर रुग्णालयात नेऊन उपचार सुरू करण्यात आले आहेत.
