14 लाख किमतीचे सोन्याचे दागिने परत देत प्रामाणिकतेचे दर्शन घडवणारे पोलीस कर्मचारी बी. एस. दंडीन
विजयपूर /प्रतिनिधी- आ
शहरातील मध्यवर्ती बस स्थानकात घडलेली ही घटना प्रामाणिकतेचे उत्तम उदाहरण ठरले आहे. आपल्या बहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी घाईत असताना चुकून बस स्थानकात विसरलेली सोन्याच्या दागिन्यांची बॅग शोधून काढून ती मूळ मालकांना सुरक्षितपणे परत करण्यात आली.
भारतीय सैन्यात कार्यरत असलेले सिंदगी तालुक्यातील सुरगीहळ्ळी गावचे जवान चंद्रशेखर सायबण्णा बोरमणी यांनी आपल्या बहिणीकडे सुमारे ८५ ग्रॅम सोन्याचे दागिने असलेली बॅग दिली होती. बहिण आणि तिची मुलगी दुपारी २.३० वाजता बागेवाडी तालुक्यातील नंद्याळ गावातून विजयपूरच्या मध्यवर्ती बस स्थानकात पोहोचल्या. प्लॅटफॉर्म क्रमांक १९ जवळ लग्नासाठी नेलेल्या चार बॅगांसह त्या बसल्या होत्या.
यानंतर त्यांना बहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी महाराष्ट्रातील मिरज येथे स्वतःच्या कारमधून नेण्यात आले. मात्र या गडबडीत सोन्याचे दागिने असलेली बॅग विजयपूर बस स्थानकातच विसरली गेली. सायंकाळी साडे सहा वाजता मिरजला पोहोचल्यानंतर बॅगेची आठवण झाली आणि ती विजयपूर बस स्थानकातच राहिल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांची घालमेल सुरू झाली.
त्यानंतर आपल्या गावातीलच आणि विजयपूरमध्ये सेवेत असलेल्या एका पोलीस शिपायाला फोन करून ही माहिती देण्यात आली. त्यांनी त्वरित गांधी चौक पोलीस ठाण्यातील कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी बी. एस. दंडीन यांना कळवले. दंडीन यांनी तात्काळ संपूर्ण बस स्थानकात शोध मोहीम राबवली. संशयास्पद बॅगांची तपासणी करत सुमारे एक तास सलग प्रयत्नांनंतर संबंधित बॅग शोधून काढली.
बॅग सापडल्याची आणि त्यामधील सर्व वस्तू सुरक्षित असल्याची माहिती त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिली. त्यांच्या या प्रामाणिक आणि तत्पर कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलीस खात्यातील अशा दक्ष व प्रामाणिक कर्मचाऱ्यांची शासन व विभागाने दखल घ्यावी आणि त्यांच्या प्रामाणिकतेला साजेसा पुरस्कार व सन्मान द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
