आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब केल्यास शेती एक उद्योग म्हणून उभी राहिल - आ. यशवंतरायगौडा पाटील
*एकरी १७२ टन ऊस उत्पादन*
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब करून शेतीकामात सातत्याने सक्रिय राहिल्यास शेती एक उद्योग म्हणून उभी राहू शकते. शेतकऱ्यांनी सरकारकडे कर्जमाफीची मागणी करणे थांबवून उत्तम शेती करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन आमदार यशवंतरायगौडा पाटील यांनी केले.
तालुक्यातील लच्याण गावाजवळील अहिरसंग रस्त्यावरील श्रीमंत इंडी यांच्या शेतात शुक्रवारी कृषी विभाग इंडी, कृषी विज्ञान केंद्र विजयपूर, भीमाशंकर साखर कारखाना मरगूर आणि शांतेश्वर विविधदेशीय सहकारी संस्था होर्ती यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस पीक क्षेत्रोत्सव व विचार संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार यशवंतरायगौडा पाटील होते.
ते म्हणाले की, जमिनीची सुपीकता जपून आधुनिक पद्धतीची ठिबक सिंचन व्यवस्था राबविल्यास ऊसाचे उत्पादन वाढवता येते. एका एकरात ४० हजार रोपे लावावीत. एका रोपाचे वजन दोन ते तीन किलो होईल याकडे लक्ष द्यावे. त्यामुळे ऊसाचे जास्त उत्पादन मिळते.
नागठाणचे आमदार विठ्ठल कटकधोंड यांनी सांगितले की, ऊसाची जात निवडताना दर्जेदार जातींची निवड करणे महत्त्वाचे आहे. चांगली वाढ आणि अधिक रिकव्हरी देणाऱ्या ८६०३२, संकेश्वरची एसएनके, एमएस १०००१, अमृता ९००४ आणि १३३३७४ अशा जातींची निवड करून चांगले उत्पादन घ्यावे.
कृषी विभागाचे संयुक्त संचालक शिवनगौडा पाटील म्हणाले की, ऊस वर्षातील ३६५ दिवस आणि दिवसाचे २४ तास वाढत असतो. त्यामुळे आधुनिक ठिबक सिंचन पद्धत अवलंबल्यास ३० ते ४० टक्क्यांपर्यंत उत्पादन वाढू शकते. खत आणि पाणी एकत्र दिल्यास ते थेट मुळांपर्यंत पोहोचत नाही; मात्र ठिबकद्वारे पाणी दिल्यास मुळांपर्यंत पोहोचून ऊसाचे वजन चांगले वाढते.
संकेश्वर येथील मुख्य शास्त्रज्ञ (जात संशोधक) संजय पाटील यांनी सांगितले की, ऊसाची पालवी जाळू नये. त्यामुळे जमिनीत असलेले पोषक घटक वाढतात. तसेच लागवडीवेळी रोगमुक्त बीजप्रक्रिया करावी. सेंद्रिय पशुखतांचा वापर केल्यास ऊसाचे वजन वाढवता येते.
ऊस विकास संशोधन केंद्र, बेळगावचे संचालक राजगोपाल यांनी सांगितले की, ऊसाचे उत्पादन वाढण्यासाठी जाती महत्त्वाच्या आहेत. मात्र आपण जमिनीची योग्य काळजी घेत नाही. जमिनीत असलेल्या सूक्ष्मजीवांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. सूक्ष्मजीव जिवंत राहिल्यास जमिनीची सुपीकता टिकते; अन्यथा जमीन नापीक होऊन उत्पादन घटते.
कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. शिवशंकर मूर्ती, प्रगतशील शेतकरी एम. आर. पाटील, बसवराज साहुकार आणि श्रीमंत इंडी यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी एकरी १७२ टन ऊस उत्पादन घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे श्रीमंत इंडी आणि नारायण साळुंके यांचा सत्कार करण्यात आला.
एम. आर. पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख एम. शिवशंकरमूर्ती, कृषी विभागाचे महादेवप्प एवूर, श्रीमंत इंडी आदींनीही मनोगत व्यक्त केले.
मंचावर कृषी प्रशासन मंडळाच्या सदस्य पार्वती कुरळे, सह विस्तार संचालक डॉ. एम. ए. जमादार, रेवगोंडप्पगौडा बिरादार, प्रगतशील शेतकरी गुरुनाथ बगली, भीमाशंकर साखर कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालिका भाग्यश्री कुंभार, कृषी उपसंचालक चंद्रकांत पवार, सहाय्यक संचालक महादेवप्प एवूर, विश्वनाथ बिरादार आदी उपस्थित होते.
इंडी तालुक्यातील लच्याण गावाजवळील अहिरसंग रस्त्यावरील शेतात आयोजित ऊस पीक क्षेत्रोत्सव व विचार संमेलनाचे उद्घाटन आमदार यशवंतरायगौडा पाटील आणि विठ्ठल कटकधोंड यांच्या हस्ते करण्यात आले.
