सुक्षेत्र शांतिकुटीर, कन्नूर येथे भक्तिपूर्ण दत्त जयंती उत्सव साजरा
विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
२ ते ४ डिसेंबर दरम्यान सुक्षेत्र शांतिकुटीर येथे दत्तजयंतीचा उत्सव ज्ञानयज्ञाच्या स्वरूपात*, अत्यंत श्रद्धा आणि भक्तीभावाने मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. ग्रामसंकिर्तन, दासबोध, *सुलभ आत्मज्ञान* ग्रंथवाचन, भजन, भारूड, पद–पद्यगायन तसेच श्री समर्थ सद्गुरु गणपतराव महाराज यांच्या प्रवचनांच्या मराठी आवृत्ती *“परमामृत बोध”* या पुस्तकाचे लोकार्पण, नववर्षानिमित्त शांतिकुटीर संप्रदायाची (आध्यात्मिक भांडार) वार्षिक दिनदर्शिका प्रकाशन, पुष्पवृष्टी, तोंडीलोत्सव आणि प्रवचने अशा कार्यक्रमांनी दत्तजयंतीचा उत्सव भक्तिभावाने पार पडला.
कार्यक्रमाला आलेल्या सर्व भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था शांतिकुटीर ट्रस्टतर्फे करण्यात आली होती.
साधकाचे लक्षण, आत्मज्ञानाचे सुगम विवेचन, विमल ब्रह्म निरूपण इत्यादी विषयांवर श्री ए. के. कुलकर्णी, श्री गणेश नाईक, श्री श्रीकृष्ण संपगांवकर यांनी ज्ञानमय प्रवचने दिली. सद्गुरूंच्या *व्हिडिओ दृश्यावलींचे प्रदर्शन*ही करण्यात आले.
शेवटच्या दिवशी प्रवचनानंतर दत्तजन्माचे प्रतीक म्हणून तोंडीलोत्सव, जोगुळ, पुष्पवृष्टी आणि महाप्रसाद यांचे आयोजन करण्यात आले होते मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर, सावंतवाडी, गोवा, बेळगाव, हुबळी, बेंगळुरू, कलबुर्गी, विजयपूर तसेच आसपासच्या अनेक गावांमधून हजारो भक्तांनी साप्ताहिक कार्यक्रमात सहभाग घेतला. एकूणच शांतिकुटीर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले होते, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही!
सप्ताहपूर्वी एक आठवडाभर *आध्यात्मिक साधन शिबिर* आयोजित करण्यात आले होते. त्यात पारंपरिक भजनांचे अर्थ समजावून सांगण्यात आले. सद्गुरूंच्या निवासस्थानी ध्यान, त्यांच्या प्रवचनांच्या ध्वनिसुरळींचे श्रवण व चर्चा असा कार्यक्रम झाला. साधकांसाठी ते एक अनमोल आध्यात्मिक साधनेचे सुवर्णसंधी ठरली.
समारोपाच्या दिवशी शांतिकुटीर ट्रस्टचे अध्यक्ष श्री गोविंद बाहेती, उपाध्यक्ष श्री रवी दाणी, ट्रस्ट कमिटी सदस्य, गुरु घराण्याचे कन्नूर येथील सदस्य आणि असंख्य भक्तवर्ग उपस्थित होते.
