डॉक्टराकडून सोने,पैशासाठी सोन्यासारख्या पत्नीची खून केल्याचा नातेवाईकांचा आरोप
विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
एका धनलोभी डॉक्टराने सोनं आणि पैशांसाठी आपल्या सोन्यासारख्या पत्नीचा गळा दाबून खून केल्याचा नातेवाईकांचा आरोप केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या प्रकरणात मृत महिलेच्या कुटुंबीयांनी न्यायाची मागणी केली असून सध्या पोलीसांनी डॉक्टराच्या भावाला ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत.“वैद्यो नारायणो हरि” असे आपण म्हणतो, पण ज्याचे काम जीव वाचवणे तेच डॉक्टर सोनं आणि पैशांच्या हव्यासापोटी आपल्या पत्नीचा खून केल्याचा आरोप ऐकायला मिळत आहे.
विजयपूर शहरातील गौरीशंकर वसाहत येथे सविता नावाच्या महिलेचा तिच्या पतीने व कुटुंबीयांनी मिळून खून केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
बीएएमएस डॉक्टर असलेला राजशेखर शिरश्याड याने पत्नी सविता शिरश्याड हिचा खून करून तो फरार झाल्याचे सांगितले जात आहे. विवाहित महिलेला हुंड्यासाठी छळले जात होते, असा आरोप मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केला असून डॉक्टरचे कुटुंब सध्या फरार आहे. मृत सविता आणि राजशेखर यांना दोन मुलगे आहेत.
सविताच्या कुटुंबीयांनी सांगितले की, लग्नावेळी दहा तोळे सोने हुंडा म्हणून दिले होते आणि लग्नाचा संपूर्ण खर्चही त्यांनीच केला होता. तरीही राजशेखर वारंवार सविताकडे पैसे व सोने आणण्याचा तगादा लावत असे. सण-उत्सव, अशा वेळीही तिच्यावर दबाव टाकला जात होता, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे राजशेखर हा विनाकारण सविताशी सतत भांडण करत असे आणि “हवे असल्यास माहेरी जा” असे म्हणत असे. मात्र समाजातील प्रतिष्ठेच्या भीतीने तिला तिथेच राहण्याचा सल्ला दिला जात होता. आज मात्र तिचा मृतदेह पाहण्याची वेळ आली आहे. सविताच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी तिच्या पालकांनी केली आहे.या प्रकरणी विजयपूर शहर महिला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांनी राजशेखरचा भाऊ शरणकुमार याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. इतर सर्व आरोपी फरार आहेत.मृतदेहावर जखमांचे निशाण आढळून आले असून कधी “हृदयविकाराचा झटका आला” तर कधी “पायऱ्यांवरून पडली” अशी खोटी कारणे सांगितली जात होती, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. आरोपी अटकेच्या भीतीने फरार झाले आहेत. न्याय मिळावा यासाठी शवागरासमोर घोषणाबाजी करून संताप व्यक्त करण्यात आला आहे
या घटनेतील सत्य काय आहे, हे पोलीस तपासातूनच स्पष्ट होणार आहे.
