विजयपूरात महिलेवर हल्ला करून मंगळसूत्र व कानातले लंपास
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
शहरात माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना घडली असून शहरातील दिवटगिरी गल्लीमध्ये संध्याकाळी दूध आणण्यासाठी दुकानाकडे निघालेल्या महिलेवर दोन अज्ञातांनी हल्ला करून तिचा कान कापला तसेच कानातले आणि मंगळसूत्र लंपास केले.
जखमी महिलेची नाव कलावती गायकवाड (वय 45) असे असून ही दुर्दैवी घटना तिच्या घराजवळच घडली. त्या अज्ञातांनी चेहऱ्यावर रूमाल बांधून आले होते. आधी त्यांनी ओळखीचे असल्याप्रमाणे बोलून अचानक हल्ला केल्याचे सांगितले जाते. महिलेच्या मुलाचे मित्र असल्याचे सांगून जवळ गेलेल्या त्यांनी तिच्यावर हल्ला करून सुमारे 10 ग्रॅमचे मंगळसूत्र आणि 1 ग्रॅमचे कानातले लुटून पलायन केले.
**कान कापल्याने गंभीर जखम**
हल्ल्यादरम्यान महिलेचा एक कान कापला गेल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. तातडीने तिला शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी जखमी कानाला तीन टाके घातले असून तोंडावर मार लागल्याने दुखापत झाल्याचे कलावती गायकवाड यांनी सांगितले.
**स्थानिक तरुणांवर संशय**
स्थानिकांच्या मते, हा प्रकार त्याच परिसरातील दोन तरुणांनी केल्याचा संशय आहे. गुन्हेगारांनी गांजाच्या नशेत हे कृत्य केले असावे, अशीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. महिलेच्या मुलाच्या ओळखीचे असल्याने पोलिस त्या दिशेने तपास अधिक तीव्र करत आहेत.
या प्रकरणी गोलगुंबज पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी जाळे पसरवले आहे. शहरातील महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. एकूणच, विजयपूर शहरातील या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी पोलीस विभागाने अधिक कठोर पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.
