Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

विद्युत प्रवाहामुळे खांबावरच व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

Responsive Ad Here



विद्युत प्रवाहामुळे खांबावरच व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू









विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

 विद्युत केबल दुरुस्तीसाठी खांबावर चढलेल्या एका व्यक्तीचा विद्युत प्रवाहाचा धक्का बसून खांबाच्या वरच दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मुद्देबिहाळ तालुक्यातील हुल्लूर गावाजवळ गुरुवारी रात्री घडली. मृत व्यक्तीचे नाव हुल्लूर गावचा रहिवासी गणपती ईरप्पा चलवादी (वय 30) असे असून, तो त्या भागातील लाईनमनकडे खासगी सहाय्यक म्हणून विद्युत दुरुस्तीचे काम करत होता.


चिम्मलग्गी लिफ्ट सिंचन कालव्याच्या पाणी पंपिंग युनिटजवळ विद्युत बिघाड झाला होता. लाईनमनांनी एल.सी. (लाइन क्लीअरन्स) घेतल्यानंतर गणपतीला खांबावर चढवून केबल दुरुस्तीसाठी पाठवले होते. मात्र अचानक केबलमध्ये विद्युत प्रवाह सुरू झाल्याने तो खांबाच्या वरच क्षणात मृत्युमुखी पडला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

एल.सी. घेतलेले असतानाही केबलमध्ये विद्युत प्रवाह कसा आला, हा सर्वांनाच पडलेला ‘मिलियन डॉलर्स’चा प्रश्न ठरला आहे. कुणीतरी जाणीवपूर्वक एल.सी.कडे दुर्लक्ष करून लाईन सुरू केल्यामुळेच हा अपघात झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच मुद्देबिहाळ पोलीस ठाण्याचे सीपीआय मेहम्मूद फसियुद्दीन यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली आहे. हेस्कॉमचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचून तपास करत आहेत. तसेच दलित संघटनांचे नेतेही घटनास्थळी दाखल झाल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते

खांबावर चढून विद्युत केबल दुरुस्ती करणे हे त्या भागातील लाईनमनांचे काम असताना, गणपतीकडून हे काम करून घेणे हा लाईनमनांनी केलेला गंभीर गुन्हा असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दोषींना अटक करावी, मृताच्या कुटुंबाला भरपाई द्यावी व न्याय द्यावा, अशी मागणी दलित नेत्यांनी सीपीआय यांच्याकडे केली आहे.

  मृत गणपतीच्या पश्चात पत्नी असून त्यांना अद्याप मुले नाहीत, अशी माहिती प्राथमिक सूत्रांकडून मिळाली आहे.