एसएसएलसी निकाल सुधारण्यासाठी शिक्षकांनी काम करावे
विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
एसएसएलसी निकाल सुधारण्यासाठी तीन महिन्यांत शिक्षकांसह सर्वांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन कर्नाटक माध्यमिक शिक्षण मंडळ व मूल्यमापन मंडळाचे अध्यक्ष प्रकाश निटनळी यांनी केले.जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत व शालेय शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील बी.एल.डी.ई. संस्थेच्या फ.गु. हलकट्टी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित विजयपूर–बागलकोट विभागस्तरीय संसाधन शिक्षक कार्यशाळेत ते बोलत होते.
विद्यार्थ्यांची सामाजिक व आर्थिक परिस्थिती तसेच त्यांची मानसिकता समजून घेऊन गुणात्मक व परिमाणात्मक अध्यापन पद्धती अवलंबाव्यात. शिक्षकांनी विद्यार्थ्यांची शिकण्याची क्षमता वाढवून विषय नीट आत्मसात होईल, यासाठी प्रयत्न करावेत. येत्या तीन महिन्यांत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी काळजीपूर्वक काम करणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले.
परीक्षेसंदर्भातील निळी रूपरेषा, नमुना प्रश्नपत्रिका व परीक्षा उपक्रम आधीच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यानुसार निकाल सुधारण्यासाठी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करून विविध प्रकारच्या चाचण्या घ्याव्यात. या चाचण्या मुख्य परीक्षेसारख्याच आहेत, अशी जाणीव विद्यार्थ्यांना करून देत त्या काटेकोरपणे पार पाडाव्यात. या दृष्टीने आपली जबाबदारी अधिक असून, ती ओळखून काम करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
एसएसएलसी ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची पायरी असून, त्यांच्या भविष्यासाठी शिक्षणाला पोषक वातावरण निर्माण करून विषयाचे सखोल आकलन होईल, यासाठी प्रयत्न करावेत. या कार्यशाळेतील संसाधन व्यक्तींनी प्रशिक्षणाचा योग्य उपयोग करून याच आठवड्यात तालुकास्तरावर कार्यशाळा आयोजित कराव्यात व विद्यार्थ्यांच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, असेही त्यांनी सांगितले.
कर्नाटक माध्यमिक शिक्षण मंडळ व मूल्यमापन मंडळाचे संचालक एच. एन. गोपालकृष्ण यांनी सांगितले की, एसएसएलसी निकाल सुधारण्यासाठी मंडळाने विविध उपक्रम हाती घेतले असून, राज्यभरात जिल्हानिहाय कार्यशाळा घेऊन संसाधन व्यक्तींना विविध विषयांवर प्रशिक्षण दिले जात आहे. सध्याच्या निकाल सुधारण्यासाठी अनेक कार्यक्रम आखण्यात आले आहेत. कृती आराखड्यानुसार काम करून विद्यार्थ्यांची शिकण्याची आवड ओळखणे व विषयानुसार अध्यापन पद्धती राबविणे ही शिक्षक व संसाधन व्यक्तींची जबाबदारी आहे. मुख्याध्यापकांसाठीही प्रशिक्षण आयोजित करावे. येत्या तीन महिन्यांत अधिकाधिक शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती वाढवावी, असे त्यांनी सांगितले.
धारवाड येथील अप्पर आयुक्त कार्यालयाचे संचालक ईश्वर नायक म्हणाले की, एसएसएलसी निकाल वाढविणे हेच एकमेव ध्येय आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड निर्माण करणे व त्यांना प्रोत्साहन देण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. प्रयत्न, कौशल्य व प्रगतीच्या दिशेने शिक्षकांनी प्रभावी अध्यापन करावे.
या बैठकीस बी.एल.डी.ई. संस्थेच्या फ.गु. हलकट्टी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य मंजीुनाथ पी., उपप्राचार्य लीना राघव, बागलकोट शालेय शिक्षण विभागाचे उपसंचालक अजित मण्णिकेरी, विजयपूर शालेय शिक्षण विभागाचे उपसंचालक वीरय्या सालिमठ, बागलकोट डायटचे प्राचार्य सलीम पाशा, विजयपूर डायटच्या प्राचार्या उमादेवी सोंनद यांच्यासह दोन्ही जिल्ह्यांतील शिक्षणाधिकारी, क्षेत्र समन्वय अधिकारी, संसाधन अधिकारी व शिक्षक उपस्थित होते.
