महिलेवर हल्ला, सोने लुटल्या प्रकरणी दोघांना अटक
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
शहरात अलीकडे महिलेवर हल्ला करून गळ्यातील मंगळसूत्र व कानातले लूट चोरीच्या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, चोरलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
येथील स्टेशन रोडवरील दिवटगिरी परिसरात शुक्रवारी संध्याकाळी आरोपींनी पायी चाललेल्या एका महिलेवर हल्ला करून तिचे सोन्याचे दागिने लुटले होते. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली होती. या प्रकरणी गोलगुंबज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचा तपास सुरू केल्यानंतर गोलगुंबज पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आरोपी आसीफ मयबूब जमादार आणि दिवटगिरी येथील रहिवासी रियान सय्यद रिहान अमीन सलाउद्दीन मनियार यांना अटक करून त्यांना ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून सुमारे ४४,००० रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रामणगौडा हट्टी आणि डीएसपी डॉ. बसवराज यलिगार यांच्या मार्गदर्शनाखाली, सीपीआय संजीव बळिगार यांच्या नेतृत्वाखाली गोलगुंबज पोलीस ठाण्याचे पीएसआय एम.डी. घोरी, हसीना वालिकार, एएसआय एस.आर. हंगरगी तसेच पोलीस कर्मचारी जे.एस. वनजकर, कुशा राठोड, अब्दुल खादीर कोलूर, मल्लिकार्जुन चावर, सोमय्या मठ आणि महादेव अडिहुडी यांचा समावेश असलेल्या तपास पथकाने ही कारवाई केली.
