वसंतदादा मार्केट यार्ड सांगली येथे फळ महोत्सव २०२५ चे आयोजन
सांगली/ प्रतिनिधी-
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, कोल्हापूर व कृषि उत्पन्न बाजार समिती, सांगली यांनी उत्पादक ते ग्राहक थेट विक्री संकल्पनेतून सांगली फळ महोत्सव-२०२५ चे आयोजन दि.१९ सप्टोंबर ते २१ सप्टेबर या कालावधीत तीन दिवसांचा फळ महोत्सव पद्मभूषण डॅा. वसंतदादा पाटील स्मृतीभवन, मार्केट यार्ड, सांगली येथे आयोजित केलेला आहे. महोत्सवाचे उद्घाटन १९ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० वा. मा. जिल्हाधिकारी, सांगली अशोक काकडे (भा.प्र.से) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. सुभाष घुले, उपसरव्यवस्थापक पणन मंडळ, सुनिल चव्हाण जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था सांगली, सुजय शिंदे सभापती बाजार समिती सांगली, विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सांगली हे उपस्थित असणार आहेत.
या फळ महोत्सवात सांगली जिल्ह्यातील ड्रॉगनफ्रुट, डाळींब, पेरू, सिताफळ व इतर फळ उत्पादक शेतकरी यांना फळ विक्री करीता मोफत स्टॅाल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच या फळ महोत्सवाचे निमित्ताने शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाची विक्री स्वतः उत्पादक शेतकरी करणार आहेत. उत्पादक शेतकरी स्टॉलचे माध्यमातून महापालिका स्तरावर शेतकर्यांची फळे पिकास बाजारपेठ मिळणार आहे . उत्पादक ते ग्राहक यांच्यात या निमित्ताने थेट संवाद होणार आहे. उत्पादक शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेतून सांगली नगरीतील नागरिकांना उत्तम दर्जाची, अस्सल नैसर्गिक रित्या पिकविलेला फळे उपलब्ध होणार आहेत.
ड्रॉगनफ्रुटचे फायदे म्हणजे कमी वेळेत पांढर्या पेशी वाढविण्यात, पचनक्रिया सुव्यवस्थित करणे, रक्तवाढी, डोळे व सांधे आजारावर गुणकारक आहे.शेतकऱ्याच्या शेतीमालाला योग्य बाजारपेठ मिळावी, त्याच्या शेतीमालाला योग्य बाजार भाव मिळावा, त्याची आर्थिक सामाजिक प्रगती व्हावी या दृष्टिकोनातून आयोजन केलेले आहे.
सदर महोत्सवास सांगली शहर वासीयांनी भेट देऊन फळांचा अस्वाद घ्यावा असे पणन मंडळाचे डॉ. सुभाष घुले आणि श्री सुजय नाना शिंदे सभापती यांनी आवाहन केले.