कौशल्य विकास तंत्र कार्यशाळेतून शाश्वत बदलाचा आत्मनिर्भर मार्ग!
अद्ययावत कौशल्य विकास तंत्र विभाग शिक्षणार्पण!
धामणंद येथे डॉ सुनीती वैद्य इन्स्पिरेशनल किट्स अँड कन्सेप्ट माध्यमातून उपक्रम
चिपळूण/ प्रतिनिधी
पंधरागाव विभाग जनता माध्यमिक शिक्षण संस्था संचलित यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धामणंद आणि दिशातर संस्था चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने अद्ययावत अशा कौशल्य विकास तंत्र कार्यशाळा विभागाचा शिक्षणार्पण सोहळा गोदरेज एरोस्पेस चे भूतपूर्व मुख्य व्यवस्थापक सुरेंद्र वैद्य व माजी आमदार विनय नातू यांच्या हस्ते पार पडला.
खेड तालुक्यातील धामणंद या सह्याद्रीच्या खोऱ्यातील या शिक्षण संस्थेत ही तंत्र कार्यशाळा श्री सुरेंद्र वैद्य यांचे संपूर्ण योगदान व उभारणीतून साकारली आहे.
(चौकट घेणे)
*गोदरेज कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट म्हणून तसेच गोदरेज एरोस्पेस चे बिजनेस हेड अशा दुहेरी जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या श्री वैद्य यांनी निवृत्तीनंतर डॉ सुनीती वैद्य इन्स्पिरेशनल किट्स अँड कन्सेप्ट या संस्थेच्या माध्यमातून गेले काही वर्षांपासून हे काम हाती घेतले आहे. धामणंद येथे त्यांनी स्वखर्चातून उभारलेली ही आठवी कार्यशाळा ठरली आहे.*
कार्यक्रमावेळी श्री. वैद्य यांच्यासमवेत पंधरागाव विभाग जनता माध्यमिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनंतराव पालांडे, दिशांतर संस्थेच्या सीमा यादव, तसेच चंद्रकांत कुलकर्णी विजय देसाई यांच्यासह प्रशालाचे मुख्याध्यापक श्री. पाटील, शिक्षक प्राध्यापक तसेच ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.
ढोल ताशांच्या निनादात पाहुण्यांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. तर कार्यक्रमस्थळी विद्यार्थिनींनी पाहुण्यांचे औक्षण केले. यानंतर कौशल्य विकास तंत्र कार्यशाळेच्या नामफलकाचे अनावरण सुरेंद्र वैद्य यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तर फीत सोडून माजी आमदार डॉ विनय नातू यांच्या हस्ते करण्यात आले.
*आठवी कार्यशाळा उभारणी*
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीयुक्त कौशल्य शिक्षण देण्यासंदर्भाने भूतपूर्व शास्त्रज्ञ संशोधक सुरेंद्र वैद्य यांनी काम सुरू केले आहे. याच अनुषंगाने त्यांचे संपूर्ण योगदान व उभारणीतून धामणंद येथील यशवंत विद्यालयात उभारलेली ही आठवी तंत्र कार्यशाळा ठरली आहे. येथील इमारतीच्या एका मोठ्या भागात या संदर्भाने एक दालन उभारण्यात आले आहे. याच्यामध्ये इलेक्ट्रिक, प्लंबिंग, स्प्रे पेंटिंग, पंप पाईप जोडणी, तारतंत्री, ब्युटी पार्लर असे सात विविध कोर्सेस चे शिक्षण प्रशिक्षण श्री. वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या दालनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शास्त्रशुद्ध रीतीने या ठिकाणी या दालनाची निर्मिती करण्यात आली आहे यासाठी पिवळी निळी व लाल रंग च्या वापराने सुरक्षितते संदर्भाने कल्पना देण्यात आली आहे.
*सह्याद्रीच्या कडे कपारीतील उपक्रम!*
उद्घाटन कार्यक्रमामध्ये डॉ. विनय नातू म्हणाले की, आज शिक्षणाच्या क्षेत्रात मोठा बदल होत आहे. पूर्वी शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान, परीक्षेत गुण मिळवणे आणि पदवी मिळवणे एवढंच मानलं जात होतं. पण आता आपण पाहतो की, केवळ मार्क्स नव्हे तर स्किल्स हवीत. यासाठी वैद्य सरांच्या माध्यमातून सह्याद्रीच्या कडे कपारीतील विद्यार्थ्यांसाठी कौशल्य, ज्ञान, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे – स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं बळ देण्यासाठी कार्यप्रवण झाले आहेत.
*कुलूप निर्मिती ते राष्ट्ररक्षण!*
देशाचे महान संशोधक शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांच्या समवेत व मार्गदर्शनाखाली ब्रह्मोस निर्मिती करिता रशियामध्ये सुरेंद्र वैद्य यांनी काम केले. ते म्हणाले, घराला सुरक्षितता पुरवणारी अर्थात कुलूप बनवणारी गोदरेज सारखी कंपनी संरक्षण क्षेत्रात कार्यरत झाली आणि देशसेवा आणि राष्ट्र सुरक्षा देता याचं काम गोदरेज एरोस्पेस या नामाभिधानाखाली करू लागली. हे सारे तंत्रज्ञानातूनच साध्य झाले. पण, सुरुवातीला प्रश्न पडला होता की हे कसे शक्य आहे? अशावेळी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी 'तुम्ही काम सुरू करा, यश मिळत जाईल' असा सल्ला दिला आणि झालंही तसंच. आम्ही काम करत गेलो आणि यातूनच ब्रह्मोस सारख्या एका अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळाली. डॉ. अब्दुल कलाम सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करताना रशियामध्ये प्रत्यक्ष निर्मिती व क्षेपणास्त्राचे टेस्टिंग अशा साऱ्या संदर्भाने मिळालेली देशसेवेची संधी ही तंत्रज्ञानातूनच प्राप्त झाली होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे त्याला कौशल्याची आणि अत्याधुनिक ज्ञानाची जोड दिली तर त्यातूनच सामर्थ्यशाली बलशाली राष्ट्राची निर्मिती शक्य असल्याचे गौरवास्पद प्रतिपादन श्री वैद्य यांनी केले.
*स्वप्नांची आत्मनिर्भर कार्यशाळा*
दिशान्तर संस्थेच्या सचिव
सौ. सीमा यादव म्हणाल्या की, ही स्किल लॅब म्हणजे केवळ एक खोली किंवा काही उपकरणं नाहीत. ही एक स्वप्नांची कार्यशाळा आहे. जिथे मुलं हातात ड्रिल मशीन धरतात, वायरिंग शिकतात, प्लंबिंगची कामं करतात आणि एक स्वप्न पाहतात. जे स्वप्न त्यांना प्रत्यक्षात कष्ट कौशल्यातून आत्मनिर्भर बनवतं.
आज जेव्हा आपले ग्रामीण विद्यार्थी वेल्डिंग, इलेक्ट्रिशियन, प्लंबिंगसारख्या कौशल्यांमध्ये पारंगत होत आहेत, तेव्हा ते नुसते 'कामगार' होत नाहीत तर ते उद्याचे उद्योजक बनण्याची क्षमता साध्य करतात. कदाचित पुढच्या काही वर्षांत, याच लॅबमध्ये शिकलेल्या मुलांचा स्वतःचा वर्कशॉप असेल. असा आत्मविश्वास त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये जागविला.
या उपक्रमाद्वारे, आम्ही एक शाश्वत बदल घडवू इच्छितो – असा बदल जो फक्त आजच्या विद्यार्थ्यांपुरता मर्यादित नसेल, तर त्यांच्या कुटुंबांपर्यंत, त्यांच्या गावांपर्यंत पोहोचेल. दिशांतर संस्था आणि यशवंत विद्यालय यांचं मन:पूर्वक अभिनंदन! या भागीदारीने खऱ्या अर्थाने समाज परिवर्तनाचा पाया घातला असल्याचे प्रतिपादन सौ. सीमा यादव यांनी सरते शेवटी केले.
*मार्कशीट सोबत स्किलसेट*
‘स्किल लॅब – Empowering Future Skills’ हा आमचा उपक्रम फक्त एका प्रकल्पापुरता मर्यादित नाही. ही एक चळवळ आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना हातात कौशल्य देऊन सक्षम करण्याची. आपल्या मुलांनी शाळा सोडल्यावर त्यांच्या हाती ‘मार्कशीट’ असेलच – पण त्याचबरोबर एक ‘स्किलसेट’ देखील असेल. हीच खरी गरज आहे. आपल्याला यश पाहायचं असेल, तर विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील चमक बघा – आणि आज ती चमक इथं आहे! शेवटी एकच सांगावंसं वाटतं, ही लॅब आज सुरू झाली आहे, उद्या याच विद्यार्थ्यांच्या हातून गावात नव्या सेवा, नव्या कल्पना आणि कदाचित नव्या व्यवसायाची सुरुवात होईल असा विश्वास सुरेंद्र वैद्य यांनी व्यक्त केला.