घड्याळावरून झालेल्या वादात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
बिहारचे रहिवासी सुनील आणि श्रुती हे दांपत्य विजयपूर शहरात सुनील पाणीपुरी विकून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी आपल्या मुलगा *अन्स* याला *श्री सत्य साई बाबा शिक्षण संस्थेच्या पूर्व प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळेत दाखल केले होते.
पाच दिवसांपूर्वी अन्स घालून आलेल्या घड्याळावरून शाळेत वाद झाला होता. नववीतील तीन विद्यार्थ्यांनी अन्सवर हल्ला करून त्याचे घड्याळ हिसकावून घेतल्याची माहिती मिळाली आहे. या मारहाणीमुळे अन्स अस्वस्थ झाला होता. त्याच्या पालकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले होते, मात्र उपचाराला प्रतिसाद न दिल्याने पाच दिवसांनी त्याचा मृत्यू झाला.
या हल्ल्याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांना माहिती दिली होती, तरीही त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे तर, मुख्याध्यापकांनी पालकांना, *"तुमचा मुलगा काही मेलाय का?"* असा उद्धट सवाल करून त्यांना निघून जायला सांगितले, असा आरोप पालक आणि स्थानिकांनी केला आहे.
यामुळे रागावलेल्या पालकांनी मुलाचा मृतदेह शाळेच्या गेटसमोर ठेवून आंदोलन सुरू केले. ही परिस्थिती पाहून शाळा प्रशासन व शाळा समितीचे अध्यक्ष यांनी शाळेला कुलूप लावून पळ काढला.
सध्या शाळा प्रशासनावर अन्सच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल विद्यार्थ्यांनी केलेल्या मारहाणीमुळे अन्सचा मृत्यू झाला की अन्य काही कारण आहे, हे तपासात उघड होईल.
गोलगुंबज पोलिसांनी या घटनेची नोंद झाली असून तपास सुरू आहे.