पर्यावरण रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी - चक्रवर्ती सुलिबेले
विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
समाहिताचे विविध उपक्रम हाती घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शरत पाटील फाउंडेशन व नन्न गिडा नन्न भूमी या संघटनांच्या वतीने शहरातील आश्रम रोडवर १००१ झाडांची लागवड करून पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला.
या वृक्षारोपण उपक्रमाचे उद्घाटन करताना प्रसिद्ध विचारवंत व युव ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष चक्रवर्ती सुलिबेले म्हणाले की, पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपल्याला जीवनदायिनी ऑक्सिजन व अन्न देणारे हे पर्यावरण अमूल्य आहे. एक ऑक्सिजन सिलिंडर किती महाग असतो, हे तुम्हाला माहिती असेल, पण झाडे मात्र आपल्याला मोफत ऑक्सिजन देतात. तरीही आपण पर्यावरणाची हानी करत आहोत, झाडांची अनावश्यक कत्तल करत आहोत. म्हणूनच झाडे लावणे आणि त्यांचे संगोपन करणे हे आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग असले पाहिजे, असे ते म्हणाले. पर्यावरण रक्षण ही एक पवित्र जबाबदारी असून प्रत्येकाने स्वयंप्रेरणेने यात सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले.
या उपक्रमाचे आयोजक शरत पाटील म्हणाले की, पर्यावरण जनजागृतीसाठी आम्ही १००१ झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. पर्यावरण रक्षण हे एक पवित्र कार्य आहे. यामध्येच सर्व सजीव सृष्टीच्या अस्तित्वाचे मुळ दडले आहे. म्हणूनच आमच्या फाउंडेशनमार्फत पर्यावरण व समाजसेवेसंबंधी विविध उपक्रम आयोजित करण्याचा आमचा उद्देश आहे, असे ते म्हणाले.युवा भारतचे संस्थापक अध्यक्ष उमेश कारजोल यांनीही आपले विचार व्यक्त केले.या कार्यक्रमाला महापौर एम. एस. करडी, नगरसेवक किरण पाटील, विजयकुमार मुरगनूर, राजू जाधव, शशांक कद्री, बसवराज बैचबाळ, करण पवार, विनीत वनरोट्टी, नमन दुबे, प्रसाद रेड्डी आदी मान्यवर उपस्थित होते.
