काजू उद्योगासाठी बंदरांचा विकास करणार.. ना.नितेश राणे
*चंदगड येथील काजू उत्पादक शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करुन धोरण ठरवणार*
कोल्हापूर/ प्रतिनिधी
कोकण आणि चंदगड विभागात स्थिरस्थावर झालेल्या काजू उद्योगाला वाव देण्यासाठी बंदरांचा विकास केला जाईल. काजू लागवडीसाठी शेतकऱ्यांना सहकार्य करू. एकूणच काजू उद्योगाच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून धोरण ठरवले जाईल,' असे आश्वासन मत्स्योद्योग व बंदरे विकासमंत्री नीतेश राणे यांनी दिले.
नुकतेच येथील काजू बोर्डाच्या कार्यालयात त्यांनी काजू प्रक्रिया उद्योजक व शेतकऱ्यांशी संवाद साधला. या विभागातील काजूचा ब्रँड तयार करण्यासंदर्भातही त्यांनी सुतोवाच केले.
कोल्हापूर पणन विभागाचे डॉ. सुभाष घुले यांनी स्वागत व मास्ताविक केले. कोल्हापूर व कोकण विभागांतील काजू लागवड व प्रक्रिया उद्योग याचा आढावा घेतला. मंत्री राणे म्हणाले, 'काजू उत्पादक शेतकरी व उद्योजकांना आर्थिक लाभ झाला पाहिजे, ही आमच्या सरकारची भूमिका आहे. प्रक्रिया उद्योग निर्भर होण्यासाठी स्थानिक काजूचे उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. त्यामुळे लागवड व प्रक्रिया उद्योग याबाबत ठोस धोरण ठरवण्याचा प्रयत्न आहे.या विभागातील काजूची चव आणि पौष्टिकता विचारात घेता जागतिक बाजारपेठेत मागणी वाढू शकते. या काजूची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले जातील,' असेही त्यांनी स्पष्ट केले. या उद्योगामध्ये व्यापाऱ्यांकडून फसवणुकीचे प्रकार घडले आहेत. याबाबतही संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.यावेळी प्रा. दीपक पाटील यांनी काजू उद्योजकांच्या समस्या मांडल्या. त्यांना खेळत्या भांडवलाची गरज
आहे. बँकांचे व्याज परवडणारे नाही शासनाने व्याज परतावा करावा. जीएसटीचा परतावा पाच टक्के करावा, अशी मागणी केली.
यावेळी वसंत निकम, प्रा. शाहू गावडे, जयवंत सुतार यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी काजू बोर्डाचे संचालक डॉ. परशराम पाटील, मोहन परब, नामदेव पाटील, विजय भांदुर्गे, तानाजी तुपारे, अजित गावडे, गोपाळ गावडे, राजेश पाटील, गुरू बल्लाळ यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.