विजयपूर जिल्ह्यात पोलिस ड्रायव्हर व शिपायावर चाकूने हल्ला करून आरोपी फरार
विजयपुर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
विजयपूर जिल्ह्यातील बसवणबागेवाडी शहरात पोलिस ड्रायव्हर आणि शिपायावर चाकूने हल्ला करून चोरट्यांनी पलायन केल्याची घटना घडली आहे.
या हल्ल्यात *रमेश गौळी (३६) या बसवणबागेवाडी पोलिस ठाण्यातील शिपायाला दुखापत झाली आहे.
काल रात्री उशिरा बसवणबागेवाडी शहरातील खासगी हॉस्पिटलजवळ काही चोरटे घरांचे दरवाजे ठोठावत असून चोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली. त्या माहितीच्या आधारे पीआय गुरूशांत दाशाळ यांच्या नेतृत्वाखाली चार पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी पाठलाग सुरू केला असता, आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान, शिपाई रमेश याने एका चोराला पकडले. त्यावेळी आरोपीने आपल्या खिशातून चाकू काढून रमेशच्या मांडीवर आणि इतर दोन ठिकाणी वार करून तेथून पलायन केले.
रमेश यास तातडीने विजयपूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तो सध्या उपचार घेत आहे. या घटनेबाबत बसवणबागेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
--रमेश गौळी (जखमी पोलिस शिपाई) याचे म्हणणे:
"नाईट राउंड करत असताना, चोरीचा प्रयत्न होत असल्याची माहिती आम्हाला मिळाली. घटनास्थळी गेल्यावर आम्हाला तिघे चोरटे दिसले. मी गाडी थांबवून, एक चोरटा पळून जाऊ नये म्हणून त्याचा पाठलाग करत होतो. त्याला पकडताच त्याने माझ्यावर चाकूने हल्ला केला आणि पळून गेला. बाकीचे कर्मचारी इतर चोरट्यांचा पाठलाग करत होते."
---
**लक्ष्मण निंबरगी, विजयपूर एसपी यांचे वक्तव्य:*
"आमचे इन्स्पेक्टर आणि चार कर्मचारी रात्री गस्त घालत असताना, चार चोरटे कुलूपबंद घर फोडण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाल्याने ते त्वरित घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना पाहून चोरटे पळू लागले. आमचे कर्मचारी त्यांच्या मागे धावले. त्यात रमेश याने एकाला पकडले असता, आरोपीने चाकूने हल्ला करून पळ काढला. या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, लवकरच आरोपींना पकडण्यात येईल. कुणीही घाबरू नये, सावध राहा."
ही घटना पोलिस दलासाठी चिंतेची बाब असली तरीही पोलिसांनी तत्काळ कारवाई केली आहे. आरोपी लवकरच गजाआड होतील, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.