ऑपरेशन सिंदूरमध्ये बेळगावची स्नुषा…
बेळगाव / विशेष प्रतिनिधी
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात फिरायला गेलेल्या २६ पर्यटकांवर दहशतवाद्यांनी गोळीबार करून त्यांची निर्घृण हत्या केली होती. 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे भारतीय लष्कराने या हल्ल्याचा बदला घेतला. यामध्ये पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या ९ तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आला. देशाला या कारवाईची सविस्तर माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरैशी या बेळगावच्या स्नुषा असून, ही बाब बेळगावकरांसाठी अभिमानास्पद आहे. मूळच्या गुजरातमधील बडोद्याच्या असलेल्या कर्नल सोफिया सध्या जम्मूमध्ये सेवारत आहेत. तर त्यांचे पती ताजुद्दीन बागेवाडी हे बेळगाव जिल्ह्याच्या गोकाक तालुक्यातील कोण्णूर गावचे असून भारतीय लष्करातील एका मॅकेनाईज्ड इन्फन्ट्रीत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
'ऑपरेशन सिंदूर'द्वारे भारताने पहलगाम येथे २६ पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूड उगवला आहे. 'ऑपरेशन सिंदूर' ची माहिती माध्यमांद्वारे उघड करणाऱ्या कर्नल सोफिया कुरैशी यांना सैन्यदलाचे नेतृत्त्व करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला अधिकारी होण्याचा बहुमान मिळाला आहे. त्यामुळे या भूमीचा नावलौकिक वाढला आहे.
