Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

"श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ, रत्नागिरी"चे एकदिवसीय राज्यस्तरीय ज्योतिष संमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

Responsive Ad Here

 "श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ, रत्नागिरी"चे एकदिवसीय राज्यस्तरीय ज्योतिष संमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा संपन्न






पुणे / प्रतिनिधी- सौ. सुप्रिया भारस्वाडकर 

प्रचार, प्रसार, प्रबोधन, प्रयत्न आणि प्रमाण या पंचसूत्रींच्या आधारावर कार्यरत असणाऱ्या, शासनमान्यता प्राप्त, तसेच आयएसओ 9001-2015 मानांकित "श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ, रत्नागिरी" या संस्थेतर्फे आयोजित १६ वे एकदिवसीय ज्योतिष संमेलन, पुरस्कार वितरण सोहळा व संस्थेच्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ दि. ४ मे २०२५ रोजी रत्नागिरी येथे संपन्न झाला. या संमेलनाला देशभरातून ९० पेक्षा जास्त ज्योतिष अभ्यासक व ज्योतिषप्रेमी उपस्थित होते.


"श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ, रत्नागिरी" संस्थेची स्थापना ७ मे २००८ रोजी अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर झाली होती. ४ ऑगस्ट २०१६ रोजी संस्था रजिस्टर झाली. यावर्षी संस्थेच्या स्थापनेला १७ वर्षे पूर्ण झाली आहेत.


या कार्यक्रमात "आयादी ज्योतिष वास्तु, नाशिक" या संस्थेच्या अध्यक्षा सौ. शुभांगिनी पांगारकर यांना "पद्माश्री", पंढरपूर येथील सुप्रसिद्ध पत्रकार, लेखक, संपादक, ज्योतिषी श्री. राधेश बादले पाटील यांना "कार्यगौरव", श्री. विलास काणे, दापोली यांना "चैतन्य भूषण", सौ. नलिनी पवार आणि सौ. पल्लवी जोशी यांना "चैतन्य सेवा", तसेच सौ. कल्पना देशपांडे यांना ज्योतिषाचार्या डॉ. सविता कुलकर्णी यांचे स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या "सर्वोत्कृष्ट शिष्या" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 


तसेच संस्थेच्या २०२४-२५ या वर्षी संपन्न झालेल्या कुंडली विशारद, कुंडली भूषण, कुंडली भास्कर, वैदिक पंडित, वास्तुशास्त्र विशारद, हस्तसामुद्रिक (प्राज्ञ, विशारद), मुखचर्याशास्त्र (प्रवीण, प्राज्ञ, विशारद) या अभ्यासक्रमात यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे पदवीदान व कौतुक सोहळा देखील संपन्न झाला.


या प्रसंगी संमेलनाध्यक्ष म्हणून कोल्हापूर येथील नेत्रविकार तज्ञ डॉ. अमित पवार, तर प्रमुख अतिथी म्हणून ज्योतिषी व आध्यात्मिक लेखिका गुरुश्री प्रिया मालवणकर, संजीवनी ज्योतिष ज्ञानप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विकास खिलारे, त्र्यंबकेश्वर येथील गुरुजी श्री. गिरीश लोहगावकर, पुणे येथील सुप्रसिद्ध ज्योतिष अभ्यासक श्री. नारायण सुखटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.


संस्थेचे नवनिर्वाचित कुलगुरू श्री. राधेश बादले पाटील यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन करून त्यांना पुढील प्रगतीसाठी आपल्या आशीर्वादपर शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ हे फक्त रत्नागिरीतीलच नाही तर जगभरातील विद्यार्थ्यांना ज्योतिषशास्त्रातील सुयोग्य शिक्षण देऊन उत्तम ज्योतिषी तयार करण्याचे महत्त्वाचे कार्य करीत आहे. 

गुरुश्री प्रिया मालवणकर यांनी "ज्योतिषांसाठी उपासना", डॉ. विकास खिलारे यांनी "ज्योतिषांच्या कुंडलीतील ग्रहयोग", तसेच श्री. नारायण सुखटणकर यांनी "ज्योतिषी कसा असावा" या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


या कार्यक्रमात "ज्योतिषीय प्रश्नमंजुषा" या सत्राचा उत्तम आस्वाद विद्यार्थ्यांनी घेतला. तसेच उत्तम कार्य करणाऱ्या ७ अभ्यासकांना "विशेष लक्षवेधी", तर २१ अभ्यासकांना "लक्षवेधी उत्तेजनार्थ" या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. तसेच परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी सौ. सुप्रिया भारस्वाडकर यांनी "वैदिक पंडित" साठी आणि तर श्री. अमित क्षत्रिय आणि सौ. मानसी करंदीकर यांनी "कुंडली भास्कर" या प्रबंधात्मक अभ्यासक्रमांसाठी विविध प्रबंध देखील सादर केले.


या ज्योतिष संमेलनाला मिळालेल्या ज्योतिष अभ्यासकांच्या, तसेच मान्यवरांच्या भरघोस प्रतिसादासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्री. प्रसन्न मुळ्ये यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. तसेच संस्थेच्या विद्यार्थ्यांनी नेहमीच सचोटीने आणि सच्चेपणाने आपले कार्य करीत ज्योतिषशास्त्राच्या साहाय्याने संकटात असलेल्या जातकांचे योग्य व सकारात्मक रितीने समुपदेशन करून त्यांना मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचालन कार्याध्यक्ष सौ. विवा साठे आणि सहसचिव सौ. सुप्रिया भारस्वाडकर यांनी केले. 


या संमेलनाबरोबरच शनिवार दि. ३ मे रोजी भूगर्भ जलशोध कार्यशाळा घेण्यात आली. विविध साधनांचा वापर करून जमिनीखालील पाण्याचा अचूक शोध कसा घ्यावा याचे मार्गदर्शन डॉ. प्रसन्न मुळ्ये यांनी केले. या कार्यशाळेला महाराष्ट्र, गोवा या राज्यांतील विविध भागातील एकूण २२ अभ्यासकांनी सहभाग घेतला होता. 

 

या दोनही दिवसांच्या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. मधुरा चिंचळकर, सचिव डॉ. चंद्रकांत वाघुळदे, खजिनदार डॉ. जयंत चुनेकर, श्री. विवेक साठे, श्री. अभय मुळे गुरुजी, सौ. दिपाली गुरव, डॉ. चंद्रशेखर जोशी, श्री. विनोद शर्मा, कु. दिपाली रामाणे इ. सभासदांनी मोलाचे सहकार्य केले.