३०जानेवारी महात्मा गांधी पुण्यतिथी- कुष्ठरोग निवारण दिवस
सोलापूर/ प्रतिनिधी
कुष्ठरोग मुक्त भारत हे महात्मा गांधीजींचे स्वप्न होते, ते नेहमी म्हणत असत की *"कुष्ठरोग हे माझ्या जीवनातील अपुर्ण राहीलेले कार्य आहे".* म्हणुन दरवर्षी दिनांक ३० जानेवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीयस्तरावर कुष्ठरोग निवारण दिन साजरा करण्यात येतो. व ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी हा पंधरवडा हा कुष्ठरोग निवारण पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येतो. या कालावधीत कुष्ठरोग विषयी शास्त्रीय माहिती समाजात विविध माध्यमांतून पसरविण्यात येते. व समाजात असलेले कुष्ठरोग विषयी गैरसमज व अंधश्रद्धा दुर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात.
सप्टेंबर २००५ साली कुष्ठरोगाचे दुरीकरण साध्य झाले आहे. म्हणजे कुष्ठरोगाचे प्रमाण दर दहा हजार लोकसंख्येच्या मध्ये एक पेक्षा कमी रूग्ण ईतके आहे. म्हणजे कुष्ठरोग ही समाजाची आरोग्याची समस्या नाही इतकं कमी झाले आहे. तर सन २०२७ पर्यंत कुष्ठरोगाचा शुन्य संसर्ग व कुष्ठरोगाचे निर्मुलन करण्याचे ध्येय आहे.
# समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरित बहुविध औषधोपचाराखाली आणणे,
# नविन सांसर्गिक रूग्ण शोधून बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडीत करुन होणारा प्रसार कमी करणे,
# समाजात कुष्ठरोगाविषयी जनजागृती करुन शास्त्रीय माहिती समाजात पसरविणे,
# सन २०२७ पर्यंत शुन्य कुष्ठरोग प्रसाराचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करणे.
# कुष्ठरोगावर अद्याप प्रतिबंधक लस उपलब्ध नाही. निर्मुलन साध्य करण्यासाठी प्राथमिक अवस्थेत रुग्ण शोधून उपचार देऊन संसर्गाची साखळी खंडीत करणे अत्यंत आवश्यक आहे.
अजुनही रुग्ण स्वताहून तपासणी करून औषधोपचार घेणारे रुग्णाचे प्रमाण अत्यल्प आहे. रुग्ण प्रगत अवस्थेत उपचारासाठी येतो. या मुळे काही प्रमाणात संसर्ग झालेला असतो. परंतु कुष्ठरोग हा कोणत्याही अवस्थेत बहुविध औषधोपचार योग्य व पुरेसा घेतल्यास १०० टक्के बरा होतो. जर उपचार घेण्यास ऊशिर झाला तर विकृती येवू शकते.
कुष्ठरोगाबाबत आजही लोकांमध्ये अनेक गैरसमज व अंधश्रद्धा आहेत. कुष्ठरोग हा अनुवंशिक आहे, शापामुळे, पाप केल्याने होतो, फक्त गरीबांना होतो, महाभयंकर व महा संसर्गकारी आहे, कुष्ठरोगावर उपचार नाही, असे अनेक गैरसमज समाजात आहेत. ते दूर होणे आवश्यक आहे.
*कुष्ठरोगाची संशयित लक्षणे -*
# शरीरावरील कोणताही फिकट पांढरा, लालसर, सपाट/ उंचावलेला बधीर चट्टा किंवा चट्टे,
# तेलकट, लालसर त्वचा,
# कानाच्या पाळ्या जाड होणे,
# तेलकट, लालसर, सुजलेला चेहरा,
# हात,पायावर बधिरता, मुंग्या येणे,
# स्नायू कमजोर होणे,
# भुवयाचे केस विरळ होणे,
# हात मनगटापासुन लुळा पडणे,
# पाय लुळा पडणे, फरफटत चालणे,
# हाताची बोटे वाकडी होणे,
# लवकर बरी न होणारी जखम,
# त्वचा विलेपन तपासणीत कुष्ठजंतू आढळणे.
आरोग्य सेवेच्या यंत्रणेतील आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी यांचेशी व जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी, ग्रामिण रुग्णालयाशी, जिल्हा रुग्णालय अथवा आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधून कुष्ठरोगांची लक्षणे असलेल्या रुग्णांनी वेळीच उपचार करुन घेणे आवश्यक आहे. सर्व शासकीय, निमशासकीय दवाखान्यात कुष्ठरोगाची तपासणी व औषधोपचार पुर्णपणे मोफत आहे.
*कुष्ठरोगाचे निदान -*
कुष्ठरोगाचे निदान सर्व शासकीय, निमशासकीय दवाखान्यात दररोज व मोफत केले जाते.
*कुष्ठरोगाचे प्रकार -* कुष्ठरोगाचे लक्षणानुसार दोन प्रकारात निदान केले जाते.
# आसांसर्गिक रुग्ण - १ ते ५ चट्टे किंवा एकच मज्जा बाधित असणारे रुग्ण,
# सांसर्गिक रूग्ण - ५ पेक्षा अधिक चट्टे किंवा १ पेक्षा अधिक मज्जा बाधित असणारे रुग्ण , त्वचा विलेपन तपासणीत कुष्ठ जंतू आढळलेले रुग्ण.
*कुष्ठरोगावरील उपचार -* बहुविध औषधोपचार
#असांसर्गिक रुग्णांसाठी - सहा महिने
# सांसर्गिक रुग्णांसाठी - बारा महिने
# या शिवाय रूग्णास दृश्य विकृती असेल तर पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया करून अवयव निट करण्यात येतो.
# पायास बधीरता असेल तर विशिष्ट प्रकारच्या चपला/ सँडल वर्षातून दोन जोड देण्यात येतात.
*कुष्ठरोग हा जिवाणूमुळे होणारा सांसर्गिक आजार आहे. कुष्ठरोगात मुख्यतः त्वचा व मज्जा बाधीत होतात. तो कोणालाही - (स्त्री /पुरुष ) होऊ शकतो .हा औषधोपचाराणे कोणत्याही अवस्थेत १०० टक्के पूर्ण बरा होणारा आजार आहे. औषधोपचार घेतला नाही तर त्या रुग्णामार्फत याचा प्रसार होतो आणि रुग्णाला विकृती येऊ शकते. लवकर निदान करून त्वरित औषधोपचार सुरू केला तर औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडीत झाल्याने समाजामध्ये होणारा प्रसार रोखणे सहज शक्य होते.*
प्रत्येकाने नियमित आपल्या शरीराची तपासणी स्वतः, आरशात पाहून, नातलगांच्या मदतीने करून घ्यावी. शंका आल्यास जवळपासच्या शासकीय रुग्णालयातून अथवा आपल्या डाँक्टर कडून निदान करून घ्यावे. घरी तपासणी साठी आलेल्या आरोग्य कर्मचारी यांचेकडून तपासणी करुन घ्यावी व कुष्ठरोग निर्मूलनास हातभार लावावा.
*कुष्ठरोरुग्ण शोध अभियान 2025*
समाजात असलेल्या प्रत्येक संशयित कुष्ठरुग्णांचा शोध पथकामार्फत शोध घेऊन त्याचे निदान निश्चित केल्यानंतर जर कुष्ठरोग आढळून आला तर त्याला तात्काळ बहुविध औषधोपचार सुरू करून संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.
या वर्षी, राज्यातील २० जिल्ह्यात हे अभियान ३१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्याचा या अभियान राबविण्याचा समावेश आहे. मार्गदर्शक सुचनांनुसार सोलापूर जिल्ह्यातील 3657590 लोकसंख्या प्रत्यक्ष तपासणीसाठी निवडली आहे. तपासणी करण्यासाठी 2768 स्त्री व पुरुष असलेली पथके निर्माण केली आहेत. ही पथके घरोघरी जाऊन प्रत्येकाची शारीरिक तपासणी करून संशयित कुष्ठरुग्णांचा शोध घेतील. या संशयितांची तपासणी वैद्यकीय अधिकारी यांचेकडून करण्यात येणार आहे. जर कुष्ठरोगाची लक्षणे आढळून आली व कुष्ठरोगाचे निदान निश्चित करण्यात आले तर तात्काळ बहुविध औषधोपचार सुरू करण्यात येणार आहे.
आपल्या घरी येणारे पथकाकडून तपासणी करून घेऊन सहकार्य करावे.
*लक्षात असू द्या -*
# सर्व सांसर्गिक रोगांपैकी कुष्ठरोग हा सर्वात कमी सांसर्गिक रोग आहे.
# नियमित, योग्य व पुरेशा औषधोपचाराने कुष्ठरोग पुर्णपणे बरा होतो.
# कुष्ठरोग कोणालाही होऊ शकतो.
# कुष्ठरोगाचे मोफत निदान व उपचार सर्व शासकीय निमशासकीय रुग्णालयात दररोज होते.
समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रयत्नाने समाजात कुष्ठरोगा बाबत असलेला भेदभाव दूर करु, सन 2027 पर्यंत शुन्य कुष्ठरोगाचा प्रसार हे ध्येय गाठुन राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या कुष्ठरोग मुक्त भारताकडे वाटचाल करुया.
डॉ. मोहन शेगर,
सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग),
सोलापूर

