बारागाव पिंपरी स्मशानभूमीतील वसंत
![]() |
| राम सुरसे विशेष लेख |
राम सुरसे/सिन्नर प्रतिनिधी
अंत्यविधी उरकून आल्यानंतर माणसं घरात प्रवेश करत नाहीत. हिंदू संस्कृतीनुसार ते अशुभ मानलं जातं. प्रथम स्वतःला पूर्ण शुचिर्भूत करून घेतात. मगच घरात प्रवेश करतात. त्या पाठीमागे एक शास्त्र आहे, मेलेल्या व्यक्तीचा संपर्क अथवा सानिध्यात आल्याने त्याच्या अंगावरील घातक किटाणू आपल्या हाताला किंवा कपड्यांना चिकटतात, घरी परतल्यानंतर त्याचा इतरांना प्रादुर्भाव होऊ शकतो, म्हणून अंत्यविधी करून आल्यानंतर स्वतःला पूर्ण शुचिर्भूत करतात व अंगावरचे कपडेही वेगळे ठेवले जातात.
दिवंगत व्यक्तीच्या शरीराचे दहन व्यवस्थितपणे व्हावे हि प्रत्येक दिवंगताचे आप्तस्वकीयांची ईच्छा असते. त्यामुळे दिवंगत व्यक्तीच्या अचेतन शरीराची योग्य ती व्यवस्था करीत असताना त्यामध्ये मनात पवित्र भाव आणि दिवंगताविषयी आदरभाव असणारे सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंप्री येथील एक सद्गृहस्थ आहे " वसंत शहाणे "
वसंतराव मृत व्यक्तीची तुपाने मालिश करण्यापासून, तिरडी बांधणे, अंत्यविधी करणे, राख सावडणे ही सर्व कामे निष्काम सेवा म्हणून मनोभावे करतात.
कधीकाळी वसंत शहाणे शिवसेनेचे आघाडीचे कार्यकर्ते होते. बारागाव पिंपरी ग्रामपंचायतीत उपसरपंच (१९९५ ते २०००) म्हणून त्यांनी काम देखील पाहिलेले आहे.ते उत्तम मोटार मेकॅनिकसुद्धा आहेत, परंतु वैवाहिक विफलता आल्याने त्यांनी संसारिक मोहाचा पूर्णतः त्याग केला व आता ते फक्त मेलेल्या व्यक्तीची विधिवत अंत्यसंस्कार करतात. गावात कोणत्याही जातीधर्माचा व्यक्ती मृत पावलेली असो माहीत पडण्याचा उशीर की तत्काळ त्या व्यक्तीच्या घरी वसंतराव हजर होतात.एकवेळ नातलग उशिरा येतील पण वसंतराव सर्वात आधी हजर होतात.
आप्तस्वकीय असल्याप्रमाणे ते मेलेल्या व्यक्तीच्या बॉडीला तूप लावतात, अंघोळ घालतात, तिरडी बांधत शास्त्रशुद्ध पद्धतीने अंतयात्रेची तयारी करतात, स्मशानभूमीत सरणाच्या लाकडांपासून तर अग्निडाग देईपर्यंतची सगळी कामे ते करतात, एवढ्यावरच थांबत नाही तर अग्निडाग दिल्यापासून राख सावडेपर्यंत ते स्मशानभूमीतच थांबतात. दुसऱ्या दिवशीही राख सावडण्याची विधिवत तयारी करतात. अस्थी पिशवीत जमा करून राख पोत्यात भरतात व घरच्या मंडळींकडे सोपवतात. शेवटी संपूर्ण स्मशानभूमी घरचे अंगण स्वच्छ करावे तसे स्वच्छ करतात. अशा पद्धतीने ते गावातील प्रत्येक अंत्यविधीचे सोपस्कार न थकता आनंदाने पार पडतात.
कोरोना काळात सगळं जग मरणाच्या भयाने घाबरलेलं असताना त्यांनी गावातील सर्व मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार स्वतः पुढाकार घेत केलेले आहे. त्यामुळे गावकरीही त्यांच्याकडे हक्काने मदत मागतात व तेही बोलवण्याची वाट न पाहत मदतीला धावून जातात. इतकंच नव्हे तर रात्री अपरात्री लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून ते स्मशानभूमीतच वास्तव्यास असतात.त्यासाठी ते ऊन वारा पावसाचीही तमा बाळगत नाही.त्यामुळे त्यांनी स्वीकारलेल्या या खडतर व्रताचे ग्रामस्थांना नेहमीच अप्रूप वाटत आलेले आहे.
त्यांच्या या आगळ्यावेगळ्या व्रतस्थ जीवन पैलू गावकऱ्यांच्या नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे.अंत्यविधीसारखं नावडीचं काम कोणी मूल्य देऊनही करणार नाही असं अमूल्य काम ते आजपर्यंत आवडीने करत आलेले आहेत व करत राहणार आहेत असे ते बोलून दाखवतात. खरंतर समाजाच्या दृष्टीने ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे.परंतु ते काम पण ते खूप निष्ठेने करतात. अशा या करत असलेल्या अंत्यविधी सेवेचा मोबदला मिळावा अशीही त्यांची अपेक्षा नसते आणि कोणी स्वखुशीने जरी मोबदला दिला तरी तो जीवन जगण्याचा पर्याय होऊ शकत नाही.
म्हणून त्यांनी निवडलेले हे अंत्यविधीसारखे सेवाभावी कार्य गावकऱ्यांच्या मनात एक वेगळा आदर्श निर्माण करणारे ठरले आहे. वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस सातत्याने उपलब्ध असलेला हा कार्यकर्ता त्यामुळे आज नकळत गावाची गरज बनला आहे. गावातील प्रत्येक मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार करणं हे आपलं काम आहे ही त्यांची सेवानिष्ठा ते वेळोवेळी आपल्या कृतीतून सिद्ध करत असतात.
मानवी जन्माच्या आधीपासून( गर्भाधान संस्कार) ते त्याच्या मृत्यूनंतर केले जाणारे
दाहकर्म हे संस्कार हिंदू जीवनशैलीत महत्वाचे आहे.मृत पावलेली व्यक्ती हि कुठल्या जातीची आहे याची तमा न बाळगता त्याचे विषयी कमालीची आस्था, प्रेम, सद्भावना मनात ठेऊन त्यांची सेवा करणारे वसंतराव शहाणे या
सिद्धपुरुषाला धन्यवाद द्यावे तितके थोडे आहे.
