किशोर-किशोरी मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा
सरस्वती मंदिर हायस्कूल व ओम साईश्वर सेवा मंडळ अजिंक्य
ओम साईश्वरचा अधिराज गुरव व ओम साईश्वरची कादंबरी तेरवणकर स्पर्धेत सर्वोत्कृष्ट
मुंबई/क्रिडा प्रतिनिधी- बाळ तोरसकर
मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने महाराष्ट्र अॅमॅच्युअर स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे १४ वर्षांखालील किशोर-किशोरी (सब ज्युनिअर) मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिर, माटुंगा (प.), मुंबई येथे संपन्न झाल्या. अंतिम फेरीच्या सामन्यात किशोरींमध्ये ओम साईश्वर सेवा मंडळाने तर किशोरांमध्ये सरस्वती मंदिर हायस्कूलने अजिंक्यपद मिळवले. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ माननीय माजी आमदार नितीन सरदेसाई याच्या हस्ते संपन्न झाला. या वेळी ओम समर्थ भारत व्यायाम मंदिराचे विश्वस्त उन्मेश नरवणे (सी. ए.) मुंबई खो खो संघटनेचे अध्यक्ष ऍड. अरुण देशमुख, उपाध्यक्ष बाळ तोरसकर, कार्याध्यक्ष सुधाकर राऊळ, कार्योपाध्यक्ष विकास पाटील, खजिनदार डलेश देसाई , प्रमुख कार्यवाह सुरेंद्र विश्वकर्मा ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिराचे प्रशिक्षक नितीन पाष्टे हे उपस्थित होते.
किशोरांच्या अंतिम सामन्यात सरस्वती मंदिर हायस्कूलने सलग दोन अजिंक्यपद विजेत्या असलेल्या ओम साईश्वर सेवा मंडळावर ८-६ (६-४,२-२) असा दोन गुणांनी निसटता विजय मिळवला. हा सामना पाहताना प्रेक्षक तहान भूख हरपून या सामन्याचा आनंद घेतला. या सामन्याच्या पहिल्या डावात सरस्वतीच्या खेळाडूंनी अधिराज गुरवला प्रथमेश तर्पेने अचानक हल्ला करून शून्य मि. बाद केल्याने व श्लोक जाधवला वरून गुप्ताने अवघ्या १० सेकंदात बाद केल्याने सामन्यात चुरस निर्माण झाली. मा. नितीन सरदेसाई व प्रेक्षकांनी या सामन्याचा भरभरून आनंद घेतला. या सामन्यात सरस्वती मंदिर हायस्कूलच्या वरून गुप्ता (५ मि. संरक्षण व १ गुण), प्रथमेश तर्पे (५.४० मि. संरक्षण व ४ गुण), महेक आदवडे (१.२०, नाबाद १.२० मि. संरक्षण व २ गुण) यांनी सरस्वतीला विजय खेचून आणून दिला व सरस्वतीच्या प्रमुख प्रशिक्षक सुधाकर राऊळ यांचे यावर्षी आम्हिच विजेते होऊ हे वाक्य खर करून दाखवलं. ओम साईश्वरच्या अधिराज गुरव (नाबाद ४ मि. संरक्षण व ३ गुण), श्राथीक गामी (२०२०, १.४० मि. संरक्षण), आरव साटम (१.४० संरक्षण व १ गुण), अर्णव राणे (१.२० मि. संरक्षण) यांनी दिलेली लढत व्यर्थ गेली व त्याच बरोबर ओम साईश्वर सेवा मंडळाची अजिंक्यपद मिळवण्याची हॅट्रिक सुध्दा हुकली.
किशोरींच्या अंतिम सामन्यात ओम साईश्वर सेवा मंडळाने श्री समर्थ व्यायाम मंदिराला जोरदार टक्कर देत एकतर्फी विजय साजरा केला व या अजिंक्यपदाचे तेच खरे दावेदार होते हे सिध्द करून दाखवलं व पहिलावहिल अजिंक्यपद खिशात घातल. ओम साईश्वरने श्री समर्थचा १०-४ (१०-२-२) असा १ डाव व ६ गुणांनी धुव्वा उडवत विजेतेपदावर नाव कोरल. सुरवाती पासूनच ओम साईश्वरच्या खेळाडूंनी जोरदार खेळ करत श्री समर्थच्या खेळाडूंना डोकं वर काढण्याची जरासुद्धा संधी दिली नाही. ओम साईश्वरच्या कादंबरी तेरवणकरने नाबाद १:३०, नाबाद १:१० मि. संरक्षण करून आक्रमणात १ खेळाडू बाद केला. आर्या जाधवने २:३० मि. संरक्षण करुन आक्रमणात १ खेळाडू बाद केला. यशस्वी कदमने ३:००, ३:२० मि. संरक्षण केले व श्री समर्थच्या विजयाच्या आशेवर पाणी फिरवले. तर श्री समर्थच्या सोनम शेलारने २:१० मि. संरक्षण करुन आक्रमणात १ खेळाडू बाद केला, ग्रंथा वारघडेने १.२० मि. संरक्षण करुन आक्रमणात १ खेळाडू बाद केला व युक्ता पटेलने १.२० मि. संरक्षण करून दिलेली लढत अपयशी ठरली.
स्पर्धेतील विजेत्या पहिल्या चार संघांना अनुक्रमे रु. सात हजार, पाच हजार, तीन हजार व दोन हजार व चषक देऊन गौरवण्यात आले. तर स्पर्धेती उत्कृष्ट खेळाडू खालील प्रमाणे ठरले.
सर्वोत्कृष्ट पारितोषिक किशोर गट किशोरी गट
सर्वोत्कृष्ट संरक्षक - प्रथमेश तर्पे (सरस्वती), सोनम शेलार (श्री समर्थ)
सर्वोत्कृष्ट आक्रमक - महेक आदवडे (सरस्वती), आर्या आचरेकर (ओम साईश्वर)
अष्टपैलू - अधिराज गुरव (ओम साईश्वर), कादंबरी तेरवणकर (ओम साईश्वर)

