पर्यावरण व मनुष्य एक अविभाज्य नाते....
बागलकोट प्रतिनिधी/ लेखिका- सौ. सुधा बेटगेरी
घर हे स्वप्नांचे महाल असते.
घरातील भिंती केवळ भिंती नसतात, त्या आठवणींच्या काँक्रीटने बांधलेल्या स्वप्नांचे भक्कम आधारस्तंभ असतात. पण जर कोणी येऊन या स्वप्नांच्या महालाला उद्ध्वस्त केले किंवा त्यावर अतिक्रमणाचा प्रयत्न केला, तर काय होईल? आपल्या कुटुंबाची स्थिती-गती काय होईल? आपण निराश्रित, बेघर होऊन जाऊ... मग कुठे जायचे? कुठे राहायचे? पुढे काय करायचे? असे असंख्य प्रश्न आपल्या मनात उभे राहतील.
अशा भयावह परिस्थितीची आपण कल्पनाही करू शकत नाही. परंतु आज आपण नकळत हीच स्थिती पृथ्वीवरील अनेक प्राणी, पक्षी, जलचर आणि अन्य जीवांवर आणत आहोत.
ही पृथ्वी, हे जल, हा वायू केवळ आपलाच नाही. असंख्य प्राणी, पक्षी, जलचर, कीटक, आणि वनस्पती यांचेही हे घर आहे. ही पृथ्वी त्यांच्याही स्वप्नांची महाल आहे. परंतु आपल्या निसर्गविनाशामुळे आपण त्यांची घरे उद्ध्वस्त करत आहोत.
एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारणारे वानर,
रानावनातील फळे खाऊन तृप्त होणारे पक्षी, नदी-समुद्रात विहार करणारे जलचर, एका फुलावरून दुसऱ्या फुलावर भिरभिरणारे कीटक... यांच्या जीवनात अतिक्रमण करून आपण त्यांच्या आनंदाला नष्ट करत आहोत. त्यांनी काय गुन्हा केला आहे?
आपल्या भौतिक सुखाच्या हव्यासात आपण या सजीवांच्या अस्तित्वावर गदा आणत आहोत. परंतु हे विसरता कामा नये की मानव हा पर्यावरणावर अवलंबून आहे. प्राणी, पक्षी, वृक्ष आणि निसर्ग याशिवाय मानवाचे अस्तित्व शून्य आहे.
पृथ्वीवरील प्रत्येक सजीव पर्यावरणाच्या साखळीचा भाग आहे. जर आपण या साखळीत हस्तक्षेप केला, तर संपूर्ण सृष्टीवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
आज वाढती लोकसंख्या, औद्योगीकरण, शहरीकरण,जंगल तोड या सर्वाचा पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहे. या सर्वामुळे जल, थल, वायू प्रदूषण वाढत चालले आहे.
ताज्या पाण्यातील प्रदूषणामुळे आज ३०% प्रजाती धोक्यात आहेत. ऑक्सिजनच्या पातळीतील फेरबदलामुळे अनेक माशांच्या प्रजातींना धोका आहे. सरासरी ४०% पेक्षा अधिक उभयचर प्रजाती प्रदूषणामुळे कमी झाल्या आहेत. प्लास्टिक प्रदूषणामुळे समुद्रात जवळजवळ ९०% समुद्री पक्ष्यांमध्ये प्लास्टिकचे अंश आढळले आहेत. दरवर्षी समुद्रकिनारी जवळजवळ ८० लाख टन प्लास्टिक फेकले जाते. जवळजवळ ७०० पेक्षा अधिक समुद्री प्रजातींना प्लास्टिकमुळे धोका उत्पन्न झाला आहे. जलप्रदूषणामुळे ७५% गोड्या पाण्यातील माशांची घट झाली आहे. सागरातील अनेक जलचरांना आधार देणाऱ्या कोरल रीफ्स ची संख्या २५% कमी झाली आहे.
जमिनीवरील प्रदूषणामुळे ४२००० पेक्षा जास्त प्रजाती आज नामशेष होण्याच्या धोक्यावर आहेत. वायु प्रदूषणामुळे पृथ्वीच्या तापमानातही फेरबदल झालेला आहे. तापमानामध्ये २ ते ३ डिग्री वाढ झाली आहे.
गेल्या काही दशकांत जमिनीखालील पाण्याची पातळी घसरत चालली आहे. दरवर्षी २८४ अब्ज टन जमिनीखालील पाणी कमी होत आहे.
भूतलावर असणारी ओलसर भूमी नैसर्गिक फिल्टरेशनचे काम करते तसेच पुराचे पाणी शोषून घेण्यासही मदत करते व कार्बन डायऑक्साईडचे नियंत्रण राखते. परंतु आज गेल्या तीनशे वर्षांपासून ८५% ओलसर भूमी नष्ट झाली आहे.
प्रदूषणामुळे वातावरणातील अत्यंत महत्त्वाचा घटक ओझोन थर पातळ होत चालला आहे, त्यामुळे अल्ट्राव्हायोलेट सारखी प्रखर किरणे पृथ्वीवर सहज पोहोचू शकतात. यामुळे डोळ्याचे आजार, त्वचेचा कर्करोग यासारखे भयंकर रोग वाढत आहेत.
वायु प्रदूषणामुळे विश्व भरात सात मिलियन लोकांचा दरवर्षी मृत्यू होतो, यातील जवळजवळ एक मिलियन, पाच वर्षाखालील मुले आहेत. ही अत्यंत चिंताजनक स्थिती आहे.
अस्थमा , ब्रोंकाइटिस, दमा यासारखे गंभीर रोग दिवसेंदिवस वाढत आहेत.
जर वेळेवर या सर्व गोष्टींमध्ये सुधारणा केली नाही आणि पर्यावरणाची काळजी घेतली नाही, तर मनुष्याच्या अस्तित्वावरही धोका आहे.
मान्य आहे की विकास हा अपरिहार्य आहे, पण तो निसर्गस्नेही असावा. झाडे तोडताना त्याची भरपाई म्हणून नवीन झाडे लावली जावीत. शहरीकरण करताना नैसर्गिक जलस्रोत, वनस्पती, प्राणी यांची हानी होणार नाही, अशा योजना आखाव्यात.
अनेक प्रजाती आज नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांचे संरक्षण करणे हे आवश्यक आहे. मनुष्यनिर्मित पदार्थ, विशेषतः प्लास्टिकसारख्या घटकांचा योग्य वापर व त्यांची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. शाळा-कॉलेजांच्या माध्यमातून पर्यावरणविषयक जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज आहे. "निसर्गाला जपणे म्हणजेच स्वतःच्या अस्तित्वाला जपणे," हे प्रत्येकाला समजावून सांगणे महत्त्वाचे आहे.
निसर्गाने मनुष्याला भरभरून सुख आणि समृद्धी दिली आहे.
थकलेल्या मनाला विसावा देणारा अथांग सागर, डोळ्यांना दीपवणारा सूर्योदय-सूर्यास्त, उंचच उंच डोंगरांच्या रांगा... हे सगळे निसर्गाच्या सौंदर्याचे प्रतीक आहेत. निसर्ग मानवाला जीवन, शांतता, विकास, आणि आनंद देतो. निसर्ग हा मानवाला मिळालेला एक अमूल्य देव आशीर्वाद आहे.
वसुंधरेचे हे डोळे दिपणारे सौंदर्य पाहता, पाहता काही ओळींना लिहिण्याची आवर्जून इच्छा होते...
" "अनेक तुझे उपकार, वसुंधरे, अनेक तुझे उपकार
ही प्रकृती, हा जल, वायू, मृदा,
सारी तुझीच देण, वसुंधरे, सारी तुझीच देण.
उंच पर्वत, खोल दरी,
झुळझुळ पाणी, मंद हवा,
घनघोर अरण्य, हिरवीगार राने,
दिसतेस किती छान, वसुंधरे, दिसतेस किती छान!
सूर्योदय-सूर्यास्ताचा हा लपंडाव,
चांदण्यांची शीतल जरतार,
पक्षांचा किलबिलाट,
फुलांचा गंध दरवळतो
तुझ्याच भोवती,
वाह तुझे रूप, वसुंधरे,
वाह तुझे रूप!
पिकांमध्ये श्वास तुझा,
फुलांमध्ये गंध तुझा,
फुलपाखरांवर रंग तुझा,
पशुपक्ष्यांना
आधार तुझा,
वाह तुझे वरदान, वसुंधरे,
वाह तुझे वरदान!
तुझ्यामुळेच ऋतुचक्रांचा खेळ,
साऱ्या सजीवांची तू जीवननाळ,
तुझ्यामुळेच जीवनाचे घड्याळ,
तुझ्यामुळेच स्वप्नांचे आभाळ,
तुझ्यामुळेच प्रेमाची मोहक माळ.
अनेक तुझे उपकार, वसुंधरे,
अनेक तुझे उपकार! """
म्हणूनच, आपल्याला निसर्गाचे रक्षण करणे, त्याचा आदर करणे आणि त्याची वृद्धी करणे गरजेचे आहे. अन्यथा, आपल्या कर्माची फळे आपल्यालाच भोगावी लागतील.
