श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळाला नंदादीप पुरस्कार
रत्नागिरी/ प्रतिनिधी- सौ. सुप्रिया भारस्वाडकर
रत्नागिरी- २४ नोव्हेंबर रोजी छ. संभाजीनगर येथे वेदमूर्ती मोहन पूर्णपात्रे गुरुजींच्या "श्रीराम नक्षत्र ज्योतिष मंडळ, संभाजीनगर" यांचे तर्फे आयोजित केलेले एकदिवसीय ज्योतिष व वास्तु अधिवेशन संपन्न झाले.
या अधिवेशनात सर्वोत्कृष्ट ज्योतिष संस्था म्हणून "श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ, रत्नागिरी" या संस्थेस "ज्योतिष नंदादीप पुरस्कार - २०२४" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. प्रसन्न मुळ्ये यांना अधिवेशनाचे अध्यक्ष श्री. अनिल चांदवडकर, भागवताचार्य श्रीराम धानोरकर, गुरुश्री प्रिया मालवणकर, ज्योतिर्विद डॉ. विकास खिलारे या मान्यवरांच्या हस्ते, तसेच श्री. राधेश बादले पाटील, श्री. अमरनाथ स्वामी, सौ. पुष्पलता शेवाळे, सौ. अंजली पोतदार, श्री. मुकेश दंडगव्हाळ यांचे उपस्थितीत गौरविण्यात आले. प्रख्यात अध्यात्मिक लेखिका व ज्योतिषी गुरुश्री प्रिया मालवणकर पुरस्कृत या पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, मानपत्र, मानचिन्ह व रोख ५ हजार रुपये असे होते. "श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ रत्नागिरी"चे संस्थापक अध्यक्ष आणि "ब्रह्मचैतन्य ज्योतिष ज्ञानपीठाचे" कुलपति डॉ. प्रसन्न मुळ्ये यांनी कुलगुरू आचार्य विजयशास्त्री संगमुळे, सचिव डॉ. चंद्रकांत वाघुळदे, सहसचिव सौ. सुप्रिया भारस्वाडकर यांचेसह पुरस्कार स्वीकारला.
प्रचार, प्रसार, प्रबोधन, प्रयत्न आणि प्रमाण या पंचसुत्रीच्या आधारावर कार्यरत असणारी "श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ, रत्नागिरी" ही शासनमान्य, तसेच आयएसओ 9001-2015 मानांकित भारतातील एकमेव संस्था आहे. यापूर्वी आजवर संस्थेमार्फत २००० पेक्षाही अधिक उत्तम ज्योतिष, वास्तु, तसेच भूगर्भ जलशोध अभ्यासक व व्यवसायिक तयार झाले आहेत.
"हा पुरस्कार म्हणजे संस्थेच्या आजवरच्या कार्याचा मोठा गौरव असून यापुढेही ज्योतिष, वास्तु, हस्तसमुद्रिक, मुखचर्याशास्त्र, भूगर्भ जलशोध इ. विविध ज्योतिषीय क्षेत्रात आपल्या संस्थेमार्फत चांगले ज्योतिष अभ्यासक घडवले जावेत यासाठी संस्था कटिबद्ध असेल.", अशा शब्दांत डॉ. प्रसन्न मुळ्ये यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
डॉ. प्रसन्न मुळ्ये यांना यापूर्वी मंदाश्री पुरस्कार, कै. चंद्रहास भगवानदिन शर्मा जन्मशताब्दी पुरस्कार, उत्कृष्ट वक्ता पुरस्कार, ग्रामरत्न पुरस्कार, ज्योतिष मार्तंड पुरस्कार, ज्योतिषरत्न पुरस्कार, ज्योतिषाचार्य पुरस्कार, १०८ निःशुल्क प्रत्यक्ष व्याख्यानांसाठी अभिनव उपक्रम पुरस्कार, तसेच सर्वोत्कृष्ट ज्योतिष संस्था म्हणून ३ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या प्रसंगी अनेक मान्यवर ज्योतिषी, तसेच संस्थेचे २०० हून विद्यार्थी उपस्थित होते.
