यत्नाळांना आता शेतकऱ्यांची कळवळा आठवली; स्वतःच्या कारखान्यातून ऊसदर देऊन बांधिलकी सिद्ध करा!
*परशुरामसिंग रजपूत यांचे आव्हान; यत्नाळांच्या भूमिकेवर जोरदार टीका*
दीपक शिंत्रे विजयपूर
**विजयपूर :** यापूर्वी साखर कारखाने तुम्हीच चालवा, असे उर्मटपणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुनावणारे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांना आता शेतकऱ्यांबद्दल कळवळा आठवला आहे. यापूर्वी शेतकऱ्यांचा अवमान करणारी वक्तव्ये करून आता त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचे नाटक ते करीत आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या नेतृत्वाखालील साखर कारखान्यातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दर देऊन आपली शेतकरीहिताची बांधिलकी सिद्ध करावी, असे आव्हान भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरपालिकेचे माजी अध्यक्ष परशुरामसिंग रजपूत यांनी दिले.
यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या पत्रकात रजपूत यांनी आमदार यत्नाळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यत्नाळ यांनी यापूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत अवमानकारक वक्तव्य केले होते. ‘तुम्हीच कारखाने चालवा’ असे म्हणत त्यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला होता. आता मात्र केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी जबाबदारीने वागत नसल्याचा बिनबुडाचा आरोप ते करीत आहेत. त्यांनी सर्वप्रथम स्वतःची जबाबदारी ओळखावी, असे रजपूत यांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याबाबतही यत्नाळ यांनी अवमानकारक भाषा वापरणे योग्य नाही. ‘तुम्ही तूप खाणारे आहात, शेतकऱ्यांच्या डोळ्यांत धूळफेक करू नका,’ अशा प्रकारची वक्तव्ये करणे अयोग्य असल्याचे रजपूत यांनी नमूद केले.
माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हे देशातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ राजकारणी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा अत्यंत आदर करतात. अशा ज्येष्ठ नेत्यांवर यत्नाळ यांनी टीका करणे चुकीचे आहे. तसेच माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याबाबतही त्यांनी आक्षेपार्ह शब्दप्रयोग केला आहे. ज्येष्ठ नेत्यांवर अशा प्रकारे टीका करणे योग्य नसल्याचे रजपूत यांनी म्हटले आहे.
केवळ टीका करणे एवढेच यत्नाळ यांना माहीत असून, त्यांच्या वक्तव्यांतून त्यांची मानसिकता दिसून येते. आमदार यत्नाळ यांनी किमान एका तरी विषयावर ठाम भूमिका घेऊन आपली बांधिलकी सिद्ध करावी. सोयीनुसार राजकारण करणे, सोयीनुसार आंदोलनाला पाठिंबा देणे आणि जनतेची दिशाभूल करणे त्यांनी थांबवावे, असे आवाहनही परशुरामसिंग रजपूत यांनी केले.
