*विधान परिषद निवडणुकीत एनडीए चा दणदणीत विजय; आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे संकेत
*प्रज्ञावंत मतदार भाजपसोबत असल्याचे पुन्हा सिद्ध : उमेश कारजोळ*
विजयपुर प्रतिनिधि -दिपक शिंत्रेे
विधान परिषद निवडणुकीत चार जागांवर भाजप आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) दणदणीत विजय मिळविला आहे. या निकालातून प्रज्ञावंत मतदार भाजपच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून, आगामी जिल्हा पंचायत, तालुका पंचायत तसेच विधानसभा निवडणुकांसाठी हा निकाल दिशादर्शक ठरणार आहे, असे मत भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे राज्य सरचिटणीस उमेश कारजोळ यांनी व्यक्त केले.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. ईव्हीएममध्ये दोष असल्याचा आरोप करून जनतेची दिशाभूल करणाऱ्या काँग्रेसला आता मतपत्रिकेद्वारे झालेल्या निवडणुकीतही पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे काँग्रेसची दुटप्पी भूमिका उघड झाली असून, पक्षाची मोठी नामुष्की झाली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेस सरकारच्या कारभारावर टीका करताना कारजोळ म्हणाले की, राज्यातील जनतेने काँग्रेसच्या कारभाराला यापूर्वीच नाकारले आहे. दुष्काळी परिस्थितीतही शेतकऱ्यांच्या हिताचे प्रभावी संरक्षण करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. विकासकामांचा अभाव, युवकांसाठी रोजगारनिर्मिती करण्यात आलेले अपयश आणि रोजगाराच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या युवकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष, ही सरकारच्या निष्क्रिय कारभाराची ठळक उदाहरणे आहेत.
या सर्व बाबींचा परिणाम निवडणुकीत दिसून आला असून, मतदारांनी काँग्रेसला योग्य धडा शिकविला आहे. आगामी जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुकांमध्येही काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीतही विधान परिषद निवडणुकीचा निकाल दिशादर्शक ठरेल, असा दावा त्यांनी केला.
विधान परिषद निवडणुकीत भाजपने विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विजय संपादन केला असून, राज्यातील जनमत भाजपच्या बाजूने असल्याचे या निकालाने पुन्हा एकदा स्पष्ट झाल्याचे उमेश कारजोळ यांनी पत्रकात नमूद केले आहे.
