२० ते २५ हजार वैध मतदार यादीतून गायब होण्याचा धोका
अक्कलकोटमध्ये परगावी असलेल्या मतदारांची नावे वगळण्याचा भाजपचा कट - नगरसेवक बसवराज हौदे
दुधनी /प्रतिनिधी
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यातील प्रत्येक बुथवरून सुमारे ५० ते ६० मतदारांची नावे वगळण्याचे मोठे षड्यंत्र सत्ताधारी भाजपकडून रचले जात असल्याचा खळबळजनक आरोप नगरसेवक बसवराज हौदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली आहे.
तालुक्यातील अनेक नागरिक रोजगारानिमित्त मुंबई, पुणे किंवा इतर शहरांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित झाले आहेत. हे नागरिक सण-उत्सव, लग्नकार्य किंवा धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने गावी येतात आणि प्रत्येक निवडणुकीत आवर्जून आपला मतदानाचा हक्क बजावतात.मात्र,हे नागरिक गावात कायमस्वरूपी राहत नाहीत, असे बनावट कारण पुढे करून आणि प्रशासनाला हाताशी धरून त्यांची नावे मतदार यादीतून पद्धतशीरपणे कमी केली जात आहेत,असा गंभीर आरोप हौदे यांनी केला आहे.
नियमानुसार ज्या मतदारांची नावे दोन ठिकाणी (डबल) आहेत, त्यांना अधिकृत नोटीस पाठवून 'फॉर्म नंबर ७' भरून घेऊन नाव कमी करण्याचा अधिकार प्रशासनाला असतो. परंतु, अक्कलकोटमध्ये परगावी गेलेल्या मतदारांना कोणतीही कल्पना न देता, स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांकडून परस्पर बनावट 'फॉर्म नंबर ७' भरून हजारो मतदारांची नावे वगळली जात असल्याचा दावा केला आहे.लहान गावे २ ते ३ बुथमधुन २५० ते ३०० मते तर मोठ्या गावात ५ ते ६ बुथ मध्ये ३०० ते ४०० मते बाद होणार संपूर्ण मतदारसंघातून तब्बल २० ते २५ हजार वैध मतदारांची नावे यादीतून गायब होण्याचा धोका आहे असे हौदे.यांनी व्यक्त केला आहे.
माजी मंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सिद्धाराम म्हेत्रे यांची राजकीय ताकद आणि जनाधार अक्कलकोटमध्ये वेगाने वाढताना दिसत आहे.या वाढत्या प्रभावाला आणि संभाव्य पराभवाला घाबरूनच सत्ताधारी विद्यमान लोकप्रतिनिधी आणि भाजपकडून हा कट रचला जात आहे.तालुक्यातील प्रत्येक नागरिकाने मतदार यादीत आपले व कुटुंबातील सदस्यांचे नाव असल्याची तातडीने खात्री करावी.विरोधी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी गाफील न राहता या प्रकरणाची गंभीरतेने शहानिशा करावी.
सत्ताधारी निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी कोणत्याही थरावर जाऊ शकतात, त्यामुळे त्यांच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवण्याचे आवाहन नगरसेवक बसवराज हौदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले आहे.
